जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक पावलं उचलली जात आहेत. मानवी हक्कांचा आम्हाला आदर आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आणताना मानवी हक्कांचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी आम्ही घेतो, असं लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच काश्मीर खोऱ्यातील तरुणांची दिशाभूल केली जात आहे. त्यांची माथी भडकवून त्यांना शस्त्रं हाती घेण्यास प्रवृत्त केलं जात असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

गेल्या अनेक महिन्यांपासून काश्मीरमध्ये तणाव आहे. सुरक्षा दलाच्या जवानांवर तरुणांकडून दगडफेक करण्यात येत आहे. या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. तरुणांकडून होत असलेल्या दगडफेकीच्या घटना रोखण्यासाठी लष्कराकडून प्रयत्न सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी दगडफेक करणाऱ्या तरुणांना रोखण्यासाठी लष्कराच्या अधिकाऱ्यानं एका तरुणाला जीपसमोर बांधलं होतं. त्यावरून अनेकांनी लष्कराच्या या कारवाईवर टीका केली होती. लष्कराकडून मानवी हक्कांचं उल्लंघन होत असल्याचा आरोपही करण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी शनिवारी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. आवश्यक ती पावले उचलली जात आहेत. येथील लोकांचा आम्ही आदर करतो. त्यांच्या हक्कांचं उल्लंघन होणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे. मानवी हक्कांचं उल्लंघन केलं जात नाही, असं रावत म्हणाले. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक पावले उचलली जात असून परिस्थिती नियंत्रणात येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दगडफेकीच्या घटनांबाबतही त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. परिस्थिती नीट हाताळण्याचं प्रशिक्षण दिलं आहे. मानवी हक्कांचं उल्लंघन होणार नाही, यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे, असंही ते म्हणाले. तरुणांची दिशाभूल केली जात आहे. त्यांना शस्त्रं हाती घेण्यास प्रवृत्त केलं जात आहे. त्यांची माथी भडकवण्याचं काम सुरू आहे, असा पुनरुच्चारही त्यांनी केला.