दहशतवाद्यांकडून मला आणि चंदीगडमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या माझ्या बहिणीला धमकावले जात असल्याचे बीएसएफ परीक्षेत अव्वल आलेला असिस्टंट कमांडंट (सहायक सेनानायक) नबील अहमद वानी याने म्हटले आहे. यासंबंधी त्याने सरकारला पत्रही पाठवले आहे. लेफ्टनंट उमर फयाजच्या हत्येनंतर कुटुंबीयांच्या सुरक्षेची चिंता वाटत आहे, असे त्याने पत्रात म्हटले आहे.

चंदीगडमध्ये सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये शिकत असलेली त्याची बहिण महाविद्यालयातील वसतिगृहात राहते. दहशतवाद्यांकडून धमकावले जात असल्याने महाविद्यालय व्यवस्थापनाने तिला दुसरीकडे राहायला जाण्यास सांगितले आहे, असेही वानीने पत्रात म्हटले आहे. वानीने १४ मे रोजी महिला आणि बालकल्याण मंत्री मेनका गांधी यांना पत्र पाठवून बहिण निदा रफीकच्या राहण्याची व्यवस्था वसतिगृहात करण्यात यावी, अशी विनंती केली आहे. काश्मिरी असल्याने चिंता वाटते आहे. विशेषतः माझ्या जन्मभूमीमुळे मला राहायला जागा मिळत नसल्याने चिंतातूर झालो आहे. ही बाब खासगी असली तरी यात मी बीएसएफला आणणार नाही. त्यामुळे यासंबंधी संबंधित मंत्र्यांना पत्र पाठवून विनंती केली आहे, असेही वानीने सांगितले.

जवानांना सुट्टीवर जाताना आपल्यासोबत शस्त्रे घेऊन जाण्याची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती बीएसएफकडे केली असल्याचेही वानीने सांगितले. पुढील दोन महिन्यांत नातेवाईकाच्या लग्नासाठी घरी जाणार आहे. मला आणि कुटुंबातील सदस्यांना दहशतवाद्यांकडून धमकावले जात आहे. उमर फयाजच्या हत्येनंतर माझ्या कुटुंबीयांच्या सुरक्षेसंबंधी चिंता वाटत आहे. माझी आई जम्मूत एकटीच राहत आहे. बहिण चंदीगडमध्ये आहे. माझ्या कुटुंबीयांना दहशतवाद्यांकडून लक्ष्य केले जात असल्याने मला चिंता वाटत आहे, असे वानीने म्हटले आहे. केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांना पत्र लिहिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याला उत्तर पाठवण्यात आले. गांधी यांनी लगेच चंदीगडमधील महाविद्यालय व्यवस्थापनाशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांनी वानीच्या बहिणीला वसतिगृहात राहण्याची परवानगी दिली आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.