काश्मीरमध्ये मोठय़ा पुरानंतर आता पाणी ओसरण्यास सुरूवात झाली असून जनजीवन अत्यंत संथपणे पूर्वपदावर येत आहे. काही वसाहतींमध्ये पाणी पंपाने काढण्यात येत आहे. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग तेरा दिवसानंतर आज पुन्हा खुला झाला असून त्यामुळे काश्मीर खोऱ्यात मदत पोहोचवणे शक्य होणार आहे.
काश्मीरमध्ये पुराने नेमके किती नुकसान झाले असावे, याचा अंदाज आता येत असून काही लोकांना घरात पावसाचे पाणी गेल्याने बाहेर काढण्यात आले आहे. झेलम नदीचे पाणी काहीसे ओसरले असून मुख्य पूर कालव्यातील पाणीही ओसरत आहे. शहरात अनेक ठिकाणी ओएनजीसी पंपांच्या मदतीने व अग्निशमन दलाच्या पंपांच्या मदतीने पाणी बाहेर काढण्यात येत असून अनेक भाग अजूनही पाण्याखाली आहेत. सुरक्षित छावण्यात हलवण्यात आलेल्या लोकांना अन्न पुरवण्यात येत आहे.  ६ सप्टेंबरला प्रथम वसाहती व घरांमध्ये पाणी घुसण्यास सुरूवात झाली होती. अनेक रस्त्यांवरील पाणी काढण्यात आले असून सार्वजनिक वाहतूक सुरू झाली आहे. विमानतळावर अजूनही पाणी साठल्याने तो बंद आहे.
काश्मीर जलप्रलयातील मृतांची संख्या २०० वर
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथे जवाहर नगर भागात मदतकार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना १३ मृतदेह सापडले असून, १०० वर्षांतील सर्वात प्रलंयकारी पुरात मरण पावलेल्यांची संख्या २०० झाली आहे. पुरात सापडलेले दोन मृतदेह गोळीबाग किनाऱ्यावर आणण्यात आले आहेत. तेथे पुरामुळे घर कोसळून १३ जण मरण पावले होते, ते मृतदेह दिसले आहेत. ढिगाऱ्यातून काल रात्री दोन मृतदेह बाहेर काढण्यात यश आले असून इतर नऊ मृतदेह किनाऱ्यावर आणण्यास आणखी वेळ लागेल, अशी माहिती सरकारी कर्मचाऱ्यांनी दिली.
मृतांमध्ये तीन मुले व दोन वयस्कर व्यक्तींचा समावेश आहे. जवाहर नगर व राजबाग या शहरांच्या भागातील पाणी काढण्यासाठी ३० पाणीशोषक पंप वापरण्यात येत आहेत. गेल्या चोवीस तासात पाण्याची पातळी काही इंचांनी कमी झाली आहे.