लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिल्यावरून चीनने घेतलेल्या आक्षेपाचे भारताने ही आमच्या देशातील अंतर्गत बाब असल्याचे सांगत, स्पष्ट शब्दात खंडन केले आहे. चीनने लडाखला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्याचा निर्णय मान्य नसल्याचे सांगत, पाकिस्तानची बाजू घेत तणाव टाळण्यासाठी भारताने जम्मू-काश्मीरसंदर्भात एकतर्फी निर्णय घेणे टाळले पाहिजे, असे म्हटले होते.

चीनच्या या भूमिकेचे भारताकडून खंडन करण्यात आले व ही आमच्या देशातील अंतर्गत बाब असल्याचे सांगण्यात आले. भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार यांनी मंगळवारी याबाबत म्हटले की, भारत अन्य देशांच्या अंतर्गत बाबींमध्ये आपले मत व्यक्त करत नाही आणि भारतालाही अन्य देशांकडून अशीच अपेक्षा आहे. लडाखला केंद्रशासित प्रदेश बनवणे हा पूर्णपणे आमच्या देशातील अंतर्गत मुद्दा आहे. तसेच, परराष्ट्र मंत्रालयाकडून हे देखील सांगण्यात आले की, राहता राहिला प्रश्न भारत-चीन सीमा वादाचा तर दोन्ही देशांनी यासंदर्भात सामंजस्याची भूमिका घेण्याचे ठरवले आहे. शिवाय, यावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही देश एकमेकांना सहकार्य करणार असल्याचे ठरले गेले असल्याचे ते म्हणाले.

या अगोदर गृह मंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीर व लडाख यांना केंद्रशासित प्रदेश बनवण्याच्या निर्णयावर आक्षेप घेणाऱ्यांना, लडाखमधील नागरिकांच्या मागणीवरूनच हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले आहे.