झारखंडमधील जमशेदपुर शहरातील एका एटीएमला भीषण आग लागल्याची घटना गुरुवारी घडली. या आगीमध्ये संपूर्ण एटीएम जळून खाक झालं. गोवुंदपुर पोलीस स्थानकाच्या अंतर्गत येणाऱ्या फाटक रोडजवळच्या एटीएमला काल सायंकाळच्या सुमारास आग लागली. ही आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र त्यात फारसे यश आलं नाही. जोरदार वारा वाहत असल्याने आग झपाट्याने वाढली आणि पाहता पाहता एटीएम मशीनला लागलेली आग संपूर्ण एटीएम युनिटमध्ये पसरली.

या एटीएमला आग लागल्याची माहिती पोलीस आणि अग्निशामन दलाला देण्यात आली. मात्र फोन केल्यानंतर एका तासाहून अधिक काळानंतर दोन्ही यंत्रणांचे अधिकारी आणि गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. हे अधिकारी येईपर्यंत बँक ऑफ इंडियाचे हे एटीएम पूर्णपणे जळून खाक झालं होतं. स्थानिकांनी पुढाकार घेत पाण्याचा मारा करत आग थोड्याफार प्रमाणात नियंत्रणात आणण्यात यश मिळवलं होतं. मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता. या आगीमध्ये एटीएम मशीन ठेवली जाते तो संपूर्ण कक्षच जळून खाक झालाय. न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तानुसार या एटीएम मशीनमध्ये ठेवण्यात आलेल्या १२ लाख रुपये मूल्य असणाऱ्या नोटाही पूर्णपणे जळून खाक झाल्यात. याशिवाय या एटीएम मशीनबरोबरच संपूर्ण कक्षच जळून खाक झाल्याने ते नुकसानही लाखोंच्या घरात असल्याचे सांगण्यात येत आहे.

वेळेत माहिती दिल्यानंतरही तासाभरानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलीस आणि अग्निशामन दलाच्या कारभारावर स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. वेळेत या यंत्रणांनी प्रतिसाद दिला असता तर एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालं नसतं असं स्थानिकांचं म्हणणं आहे. स्थानिकांनीच पुढाकार घेऊन आगीवर नियंत्रण मिळवलं नसतं तर आग आजूबाजूच्या दुकांनांमध्ये पसरली असती. या एटीएमला आग कशी लागली यासंदर्भातील तपास आता सुरु करण्यात आला आहे. काही जणांच्या सांगण्यानुसार शॉर्ट सर्किटमुळे एटीएमला आग लागल्याचे समजते. मात्र तपासानंतरच आगीचं खरं कारण स्पष्ट होऊ शकेल. या प्रकरणात आता पोलीस पुढील तपास करत आहेत.