लोकसभेत गुरुवारी प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच बिहारमधील जनअधिकार पक्षाचे खासदार पप्पू यादव यांनी बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी करत केंद्र सरकारविरोधात घोषणा द्यायला सुरुवात केली.

सभागृहात आणलेली सत्ताधारी सदस्यांकडे भिरकावली. सभापतींच्या समोर असलेल्या मोकळ्या जागेत येत पप्पू यादव यांनी कामकाज थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यांचा हा प्रताप पाहून सभागृहात उपस्थित असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, संसदीय कामकाजमंत्री अनंतकुमार यांनी यादव यांची समजूत घालून शांत केले. पण, यादव यांनी सभापतींसमोरच ठिय्या दिला. अधूनमधून नारा देत कामकाजात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. सभापती सुमित्रा महाजन यांनीही त्यांना शांत बसण्यास सांगितले, तरीही यादव यांनी त्यांचे ऐकले नाही. सकाळच्या सत्रातील कामकाज संपल्यानंतर भोजनासाठी सभागृह तहकूब करताना महाजन यांनी पप्पू यादव यांच्या वर्तवणुकीवर संताप व्यक्त केला. तुमच्या प्रश्नाबाबत सभागृह संवेदनशील आहे पण, आजची तुमची वागणूक अक्षेपार्ह आहे. तुम्ही सभागृहाची माफी मागा, असे महाजन यांनी सांगितल्याने अखेर पप्पू यादव यांनी माफी मागितली.

प्रत्येक मुद्दय़ावर टिप्पणी नाही!

भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी खेळांसाठी दिल्या जाणाऱ्या निधीसंदर्भात प्रश्न विचारला होता. त्याला पूरक प्रश्न आसामचे खादार गौरव गोगोई यांनी विचारला होता. त्यात, पदकविजेती हिमा दास हिच्या इंग्रजी बोलण्यावरून ऑलम्पिक फेडरेशनने केलेल्या टिप्पणीवर गोगोई यांनी धारेवर धरले. फेडरेशनच्या या वर्तवणुकीवर मोदींनी कोण्तीच प्रतिक्रिया दिली नसल्याचाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला. विविध प्रश्नांवर क्रीडामंत्री राजवर्धन राठोड यांनी सविस्तर आणि अभ्यासपूर्ण उत्तरे दिली. त्याचे सभापतींनी कैतुकही केले पण, मंत्रिमहोदयांनी गोगोई यांना आपण सगळ्याच मुद्दय़ांवर उत्तर देणार नाही, असे रोखठोक सांगितल्याने विरोधकांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

जयंत सिन्हांचा निषेध

विमान वाहतुकीसंदर्भातील प्रश्नावर उत्तर देण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री जयंत सिन्हा उभे राहताच विरोधकांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. मॉबलिंचिंग प्रकरणात जामिनावर सुटलेल्या चार आरोपींच्या गळ्यात सिन्हा यांनी हार घातला होता. त्यावरून विरोधी पक्षांच्या सदस्यांनी त्यांचा निषेध केला. सभापती सुमित्रा महाजन यांनी या सदस्यांना शांत राहण्यास सांगितले. सभागृहात गोंधळ घालण्यासाठी नवी क्लृप्ती शोधून काढून नका, असे त्यांनी खडसावले पण, विरोधकांचा निषेध सुरूच राहिला.