राहुल गांधी हेच सध्या काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांच्या पश्चात काँग्रेसच्या अध्यक्षांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी समितीची स्थापना केली पाहिजे, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जनार्दन द्विवेदी यांनी व्यक्त केले. तसेच राहुल गांधी यांच्या राजीनाम्यावर बोलताना त्यांनी काँग्रेसच्या अन्य नेत्यांसाठी त्यांची जबाबदारी स्वीकारणे हा एक आदर्श असल्याचे म्हटले आहे.

सद्य परिस्थिती पाहता काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीचे आयोजन केले पाहिजे, तसेच पक्षाच्या नव्या अध्यक्षांच्या नावावरही लवकरात लवकर शिक्कामोर्तब केले पाहिजे, असे द्विवेदी यावेळी म्हणाले. तसेच पक्षाने कार्यकारी समितीतील सदस्यांचे मत जाणून घेतले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

द्विवेदी बऱ्याच कालावधीपासून काँग्रेसचे महासचिव म्हणून कार्यरत होते. 2018 मध्ये त्यांनी स्वेच्छेने हे पद सोडले होते. त्यांनी इंदिरा गांधी, राजीव गांधी, नरसिंहा राव आणि सोनिया गांधी यांच्याबरोबरही काम केले आहे. ते सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात.