देशाची लोकशाही धोक्यात आली असून त्याला जातीवादी पक्ष जबाबदार आहेत. सध्याची परिस्थिती लक्षात घेता देशात लोकशाही जिवंत आहे की नाही ? अशी शंका वाटत असल्याचं वक्तव्य माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांनी केलं आहे. तसंच संसदेत सत्ताधारी भाजपा विरोधकांना जनतेच्या प्रश्नावर बोलू देत नाही असा आरोप करताना विरोधकांचा आवाज दाबण्याचे काम केले जात आहे अशी टीका देवेगौडा यांनी केली आहे.

जनता दल (सेक्युलर) महाराष्ट्र कार्यकर्ता राज्यस्तरीय परिषदेमध्ये आगामी विधानसभा निवडणुक, पुरोगामी व समविचार पक्षांची एकजुट या विषयावर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले. यावेळी जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शरद पाटील, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील तसंच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी म्हटलं की, ‘लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर शदर पवार, मायावती, अखिलेश यादव, ममता यांच्यासह इतर धर्मनिरपेक्ष पक्षाच्या नेत्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. पण त्यातून काही साध्य झाले नाही’. s

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करा
कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी शेतकर्‍यांच्या दृष्टीने चांगले निर्णय घेत आहेत. त्यामध्ये सर्वाधिक शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय घेतल्याने त्याचा फायदा सर्वांना झाला आहे. असे सरकार महाराष्ट्रात येण्याच्या दृष्टीने आगामी विधानसभा निवडणुकीत समविचारी धर्मनिरपेक्ष पक्षांना सोबत घेण्याची गरज आहे. त्यासाठी प्रकाश आंबेडकर यांच्याशी देखील चर्चा करावी. तसेच कार्यकर्त्यांनी कामाला लागावे अशी सुचना यावेळी त्यांनी केली.