जपानच्या ओसाका प्रांताला सोमवारी भूकंपाचा तीव्र धक्का बसला. भूकंपामुळे किमान तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर ९० पेक्षा जास्त लोक जखमी झाल्याची माहिती आहे. मृतांमध्ये एका ९ वर्षांच्या मुलीचा समावेष आहे. फॉक्स न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार रिश्टर स्केलवर ६.१ इतकी या भूकंपाची तीव्रता होती. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

स्थानिक वेळेनुसार सकाळी ७ वाजून ५८ मिनिटांच्या सुमारास भूकंपाचा धक्का बसला. अद्याप सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही, मात्र या भूकंपामुळे बरंच नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. जपान टाइम्सनुसार, अण्वस्त्र तळ, बुलेट ट्रेनचे मार्ग आणि अन्य अनेक ठिकाणी नुकसान झाल्याची शक्यता आहे. अनेक रस्ते बंद करण्यात आलेत. सर्वाधिक फटका ओसाकाला बसला असून येथे भूकंपानंतर जवळपास 170,000 घरांमध्ये वीज पुरवठा ठप्प झाला आहे.

क्योडो न्यूजनुसार, ओसाकामध्ये स्विमींग पुलजवळ भिंत पडल्याने ८० वर्षीय वृद्ध व्यक्ती आणि ९ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला.