अकरा जण बेपत्ता, अमेरिका मदत करणार

जपानमध्ये गुरुवारी व शनिवारी झालेल्या भूकंपानंतर अनेक लोक दोन दिवस भीतीने मोटारीतच झोपले, दरम्यान दक्षिण जपानमध्ये अकरा लोक बेपत्ता असून भूकंपबळींची संख्या ४१ झाली आहे. संयुक्त मदतकार्य सुरू करण्यात आले असून टोयोटा कंपनीने पुढील आठवडाभर वाहनांची निर्मिती बंद केली आहे. कारण भूकंपानंतर सुटय़ा भागांचा तुटवडा आहे. हजारो मदत कार्यकर्ते डोंगराळ भागात वाचलेल्या लोकांचा शोध घेत असून हेलिकॉप्टर्सही पाठवण्यात आली आहेत. दरम्यान, अमेरिका जपानला भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसनात मदत करणार आहे.

किमान १ लाख ८० हजार लोक बेघर झाले असून त्यांच्यासाठी निवारा सुविधा करण्यात येत आहे. त्यांना तांदूळ अन्न म्हणून दिले जात आहे. अमेरिकेचे नौदल व सागरी तळ जपानमध्ये असून तेथे त्यांचे ५० हजार सैन्यही आहे. जपानचे पंतप्रधान शिन्झो अ‍ॅबे यांनी सांगितले, की आम्ही मदतकार्य करणाऱ्यांचे आभारी आहोत. कुमामोटो परफेक्चर आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकारी शिओरी याताबे यांनी सांगितले की अकरा जण बेपत्ता असून त्याचा तपशील मिळालेला नाही पण जपानी माध्यमांच्या बातम्यानुसार त्यातील आठ जण मिनामीअलो खेडय़ातील आहेत. मिनामीअलो हे ठिकाण माउंटअसो या १५९२ मीटर उंच डोंगराच्या नैर्ऋत्येला आहे. माउंट असो हा सर्वात मोठा जिवंत ज्वालामुखी आहे. कोसळलेले ढिगारे उपसण्याचे काम चालू असून कुमामोटो व आजूबाजूच्या भागात लागोपाठ भूकंपाचे धक्के बसले. पहिल्या धक्क्यात नऊ जण मरण पावले तर दुसऱ्या धक्क्य़ात ३२ जण मरण पावले. कुमामोटो या शहराची लोकसंख्या ७,४०,००० आहे. कुमामोटोतील ८० हजार घरांमध्ये अजूनही वीजपुरवठा खंडित आहे. ४ लाख घरांमध्ये पाणीपुरवठा बंद आहे. दोन भूकंपात हजार इमारतींचे नुकसान झाले असून त्यात ९० घरे कोसळली आहेत. माशिकी येथे सर्वात जास्त फटका बसला असून तेथे २० जण ठार झाले. मिनामीअसो येथे भूस्खलन झाले. टोयोटा मोटर कार्पोरेशनने म्हटले आहे, की जपानमध्ये मोटारींची जुळणी करण्याचे काम आठवडाभर बंद ठेवण्यात आले आहे.