भारतात उत्पादन करून मोटारींची आयात करणार
मेक इन इंडिया मोहिमेसाठी जपानमध्ये १२ अब्ज डॉलरचा निधी वेगळा ठेवण्यात आला असून हा कार्यक्रम जपानमध्येही महत्त्वाचा मानला गेला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले. आता जपान मारूती सुझुकीचे उत्पादन भारतात करून नंतर या मोटारींची मायदेशी आयात करणार आहे असे त्यांनी सूचित केले.
भारत व जपानाची मैत्री किती गाढ आहे हे सांगताना जपान-भारत उद्योग मंचाच्या बैठकीत त्यांनी सांगितले की, मेक इन इंडियासाठी जपानमध्ये वर्षांला ११-१२ अब्ज डॉलरची तरतूद करण्यात आली आहे. मेक इन इंडियाचा कार्यक्रमाला जपाननेही तेवढेच महत्त्व दिले आहे. जपान प्रथमच भारतातून मोटारी आयात करणार आहे.
मारूती सुझुकीचे उत्पादन भारतात होईल. जपानी कंपनी ते उत्पादन करील व नंतर त्या मोटारी जपानमध्ये निर्यात होतील. बुलेट ट्रेनमध्येच नव्हे तर एकूणच आर्थिक विकासाच्या वेगात दोन्ही देशांचे सहकार्य राहणार आहे असे मोदी म्हणाले.
गेल्या जपान दौऱ्यात भारतामध्ये ३५ अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. तेव्हा सगळ्यांना तो आकडा धक्कादायक वाटला पण आता ते खरे होताना दिसत आहे. जागतिक आर्थिक मंदीसदृश स्थितीत भारत-जपानची भागीदारी महत्त्वाची आहे. भारत ही संधींची भूमी आहे. जपानचे पंतप्रधान शिन्झो अॅबे यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी यांचा धोरणे व सुधारणा राबवण्याचा वेग शिनकानसेन बुलेट ट्रेनसारखा आहे व त्यांचा सुधारणा कार्यक्रम शिनकानसेन इतकाच सुरक्षित आहे. भारत हे जपानसाठी गुंतवणुकीसाठी आकर्षण केंद्र ठरले आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.