जपानमध्ये काल ७.८ रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाल्यानंतर आता तेथे मोठय़ा भूकंपाची शक्यता आहे त्यामुळे जपानने सतर्क रहावे, असा इशारा जपानच्या भूकंपतज्ज्ञांनी दिला आहे. या भूकंपात काल काही लोक जखमी झाले होते. भूकंपात टोकियो येथे अनेक इमारती रात्रीच्या वेळी हादरल्या. भूकंपाचा केंद्रबिंदू हा प्रशांत महासागरात टोकियोच्या दक्षिणेला ८७४ किलोमीटर अंतरावर होता असे अमेरिकेच्या भूगर्भशास्त्र संस्थेने सांगितले.
या भूकंपाची तीव्रता जास्त असली तरी खोली ६७६ किलोमीटर असल्याने फार हानी झाली नाही. या भूकंपात एका ५६ वर्षांच्या व्यक्तीची बरगडीची हाडे मोडली पण कुणीही मरण पावले नाही. किमान बारा जण यात जखमी झाले आहेत. टोकियो टॉवरवर ४०० लोक अडकले होते कारण लिफ्ट तासभर बंद पडली होती. हानेडा विमानतळावर धावपट्टी तीस मिनिटे बंद होती व रेल्वेही तात्पुरत्या थांबल्या होत्या. अणुप्रकल्पांना कुठलाही धोका निर्माण झालेला नाही.