जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी बुधवारी त्यांच्या पक्षातील काही खासदार नाईट क्लबमध्ये गेल्याबद्दल देशाची माफी मागितली. देशातील सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून करोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे असं आवाहन केलं जात आहे. गरज नसेल तर घराबाहेर पडून नका असं एकीकडे सरकारकडूनच सांगितलं जात असतानाच दुसरीकडे युतीचं सरकार असणाऱ्या सत्ताधारी पक्षातील काही खासदार सोमवारी एखा खासगी नाईट क्लबमध्ये दिसून आले. त्यानंतर आता पंतप्रधानांनाच या खासदारांच्या वतीने देशाची माफी मागावी लागली आहे.

पंतप्रधान सुगा यांच्या सरकारवर सुरवातीपासूनच करोनाविरुद्धच्या लढ्यामध्ये अपयशी होत असल्याचा ठपका लावत टीका केली जात आहे. करोनाच्या प्रादुर्भावाला तोंड देण्यासाठी तो रोखण्यासाठी सरकारी यंत्रणा आणि निर्णय अपुरे असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. असं असतानाच खासदारांनीच नियमांचे उल्लंघन करुन नाईट क्लबमध्ये हजेरी लावल्याने जपान सरकारवर टीकेचा भडीमार होताना दिसत आहे. “लोकांनी रात्री आठनंतर घारबाहेर पडू नये, बाहेरच्या गोष्टी खाणं टाळावं आणि गरज नसेल तर उगाच बाहेर फिरु नये असं आम्ही लोकांना सांगत असतानाच आमच्या खासदारांनीच याचं उल्लंघन केल्याबद्दल मी खूप निराश आणि दु:खी झालो आहे. जनतेचा आपल्यावरील विश्वास वाढेल अशापद्धतीचं आचरण प्रत्येक खासदाराचं असावं,” अशा शब्दांमध्ये सुगा यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल खंत व्यक्त केली.

जपानने या महिन्यामध्ये टोकीयो आणि इतर शहरांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आत्पकाळ घोषित केला आहे. सरकारने रेस्तराँ आणि बार मालकांना रात्री आठ व्यवसाय करु नये आणि अस्थापने बंद ठेवावीत असे आदेश दिलेत. मात्र सध्या तरी सरकारने या आदेशांनुसार कठोर दंड वसुली करण्यास सुरुवात केलेली नसल्याने अनेक ठिकाणी या सूचनांचे उल्लंघन केल्याचे पहायला मिळत आहे.

वरिष्ठ खासदारांपैकी एक असणाऱ्या जुन मत्सूमोटो यांनी प्रसारमाध्यमांशी यासंदर्भात बोलताना, “जेव्हा आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून लोकांना धैर्य ठेवण्याचं आवाहन करतो तेव्हा मी स्वत: अशाप्रकारे बेजबाबदारपणे वागणं खूप चुकीचं आहे,”  असं मत व्यक्त केलं आहे. जुन यांनीच प्रसारमाध्यमांशी बोलताना आपण सोमवारी एका इटालियन रेस्तराँमध्ये डिनर केल्यानंतर टोकीयोमधील दोन नाईट क्लबमध्ये गेलो होतो अशी कबुली दिली आहे.