एका आठवडय़ात दोन परदेशी नागरिक हिंसाचारात ठार

मोटारसायकलवरून आलेल्या बुरखाधारी हल्लेखोरांनी शनिवारी जपानच्या एका ६६ वर्षीय नागिरकाची गोळ्या घालून हत्या केली. कोणत्याही संघटनेने या घटनेची जबाबदारी स्वीकारलेली नाही. मात्र, इसिसच्या दिशेने काही जणांनी संशयाची सुई वळविली आहे. काही दिवसांपूर्वी इटालीच्या एका कामगाराची हत्या करण्यात आली होती आणि त्याची हत्या केल्याची जबाबदारी इसिसने स्वीकारली होती.

जपानच्या या नागरिकाचे नाव होसी कोनियो असे असून ते रंगपूर जिल्ह्य़ात रिक्षातून जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांची गोळ्या घालून हत्या केली, असे पोलिसांनी सांगितले. बुरखाधारी हल्लेखोरांनी कोनियो यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या त्यामध्ये ते जागीच ठार झाले त्यावरून ही हत्या ठरवून करण्यात आल्याचा संशय आहे.

कोनियो गेल्या सहा महिन्यांपासून रंगपूर येथे वास्तव्य करीत होते. रिक्षातून शेतात जात असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले. हल्लेखोरांनी कोनियो यांच्या छातीवर, खांद्यावर आणि हातावर गोळ्या झाडल्या आणि ते पसार झाले.

ढाका येथील गुलशन परिसरात असलेल्या बाजारपेठेत पाच दिवसांपूर्वी इटालीतील कामगार सेझार तव्हेल्ला (५०) यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येची जबाबदारी इसिसने स्वीकारली होती. मात्र बांगलादेश सरकारने त्याचा इन्कार केला होता.

सुरक्षेची समस्या

दरम्यान, शनिवारी झालेल्या या हत्यासत्रामुळे बांगला देशातील परदेशी नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न चांगलाच ऐरणीवर आला असून यासंदर्भात सरकारवरही दबाव येत आहे. विविध समाजमाध्यमांवरही या घटनेचे तीव्र पडसाद उमटल्यामुळे परदेशी नागरिकांबरोबरच सर्वसामान्य नागरिकही आता कमालीचे चिंताग्रस्त झाले आहेत.