माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांनी शुक्रवारी श्रद्धांजली वाहिली. ‘वाजपेयी जपानचे चांगले मित्र होते’, अशा शब्दांत त्यांनी वाजपेयींबद्दल गौरवौद्गार काढले. जपानप्रमाणेच इस्रायल, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि मॉरिशस आदी देशांमधूनही वाजपेयींना श्रद्धांजली वाहणारे संदेश आले आहेत.


अबे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले की, भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाच्या बातमीने मला आतीव दुःख झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या एका संदेशाद्वारे अबे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या संदेशाची एक प्रत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी ट्विटरवरुन प्रसिद्ध केली आहे.

या संदेशात अबे यांनी वाजपेयींच्या २००१ मधील जपानच्या भेटीबाबत उल्लेख केला आहे. ते म्हणतात, भारताच्या या नेत्याचे जपान आणि भारतादरम्यान मैत्री निर्माण करण्यात महत्वाची भुमिका बजावली होती. ते जपानचे चांगले मित्र होते. त्यामुळे जपान-भारताच्या आजच्या मैत्रीचा ते कोनशिला ठरले आहेत. अशा आमच्या मित्राच्या आत्माला शांती लाभो अशी मी माझ्या अंतःकरणातून प्रार्थना करतो, असे अबे यांनी संदेशात म्हटले आहे.

दीर्घ काळापासून आजारी असलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांनी वयाच्या ९३व्या वर्षी गुरुवारी (दि. १६) अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दिल्लीच्या ‘राष्ट्रीय स्मृती स्थळ’ येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी निघालेल्या त्यांच्या अंत्ययात्रेत हजारोंच्या संख्येने त्यांच्या चाहत्यांनी आणि नागरिकांनी हजेरी लावली होती.