रेल्वे अपघातांचे सत्र सुरु असतानाच आता रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी भारताने जपानची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. जपानमधील रेल्वे सुरक्षा तज्ज्ञांचे पथक भारत दौऱ्यावर आले असून रेल्वे मंत्रालयातील अधिकारी आणि भारतातील रेल्वे सुरक्षा तज्ज्ञांशी हे पथक चर्चा करणार आहे. रेल्वे सुरक्षा तज्ज्ञांचे पथक पाठवावे, अशी विनंती जुलै महिन्यात भारताने जपानला केली होती. जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांच्या भारत दौऱ्याआधी जपान सरकारने रेल्वे सुरक्षा तज्ज्ञांचे पथक भारतात पाठवले आले. हे पथक पाच दिवसांसाठी भारतात आले असून जपानच्या दूतावासाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकातून ही माहिती देण्यात आली.

उत्तर प्रदेशात गेल्या काही दिवसांमध्ये दोन मोठे अपघात झाले. उत्कल एक्स्प्रेसच्या अपघातात २० हून अधिक प्रवाशांना जीव गमवावा लागला. तर कैफियत एक्स्प्रेसमध्ये  ७० हून अधिक प्रवासी जखमी झाले. त्यामुळे रेल्वे वाहतुकीच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. त्यामुळे भारताने आता सुरक्षित रेल्वे प्रवासासाठी जपानची मदत घेण्याची तयारी सुरु केली आहे. दोन्ही देशांकडून भारतातील रेल्वेच्या सुरक्षेसाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती जपानच्या दूतावासाकडून देण्यात आली. यासाठी जपानच्या पायाभूत विकास, वाहतूक आणि पर्यटन मंत्रालयाने फेब्रुवारी २०१७ मध्ये भारताच्या रेल्वे मंत्रालयाशी सामंजस्य करार केला असल्याची माहितीदेखील जपानच्या दूतावासाने दिली.

वाचा- आसनगावजवळ नागपूर- मुंबई दुरांतो एक्स्प्रेसचे ७ डबे रुळावरुन घसरले

जपानने रेल्वे सुरक्षा तज्ज्ञांचे पथक भारतात पाठवावे, अशी मागणी केंद्र सरकारकडून जुलै २०१७ मध्ये करण्यात आली होती. या पथकामध्ये रेल्वेशी संबंधित संस्था, जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सी (जेआयसीए) आणि जपान सरकारच्या पायाभूत सुविधा, वाहतूक, पर्यटन मंत्रालयातील सुरक्षा तज्ज्ञांचा समावेश आहे. हे तज्ज्ञ भारतातील सध्याच्या रेल्वे सुरक्षेचा आढावा घेण्यात येणार आहे. यानंतर संबंधित तज्ज्ञांकडून जेआयसीए आणि भारतीय रेल्वे मंत्रालय यांच्या माध्यमातून सुरक्षेसाठी आणखी काय उपाय करण्यात येतील, यावर चर्चा करण्यात येईल.