जपानचे एफ-३५ हे अत्याधुनिक फायटर विमान शुक्रवारी पॅसिफिक महासागरात कोसळले. एफ-३५ हे अमेरिकन बनावटीचे जगातील अत्याधुनिक फायटर विमान आहे. एफ-३५ च्या अपघातामुळे जगातील या महागडया फायटर विमानाच्या सुरक्षेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उत्तर जापानमधील मिसावा एअर फोर्सच्या तळावरुन सरावासाठी या स्टेल्थ फायटर विमानाने उड्डाण केले होते.

उड्डाण केल्यानंतर काही मिनिटातच हे विमान रडारवरुन बेपत्ता झाले. विमानाला अपघात होण्याआधी मिशन रद्द करण्याचे संकेत वैमानिकाने दिले होते असे संरक्षण अधिकाऱ्याने सांगितले. कोसळलेल्या एफ-३५ चे काही भाग सापडल्याचे जपानचे संरक्षण मंत्री ताकिशी वाया यांनी सांगितले.

जपानी आणि अमेरिकन विमाने, युद्धनौका बेपत्ता वैमानिकाचा शोध घेत आहेत. F-35 विमानाचा वैमानिक चाळीशीतील होता तसेच त्याच्याकडे ३,२०० तास उड्डाणाचा अनुभव होता. जपानचे एफ-३५ चे स्क्वाड्रन अकरा दिवसापूर्वीच कार्यरत झाले आहे. एफ-३५ हे पाचव्या पिढीचे लढाऊ विमान असून शत्रूच्या रडारला चकवा देऊन अचूक हल्ला करण्याची या विमानांची क्षमता आहे.

याआधी मागच्यावर्षी सप्टेंबर महिन्यात दक्षिण केरोलिनामधील मरीन कॉर्पस एअर स्टेशनजवळ एफ-३५ बी कोसळले होते. त्यावेळी या अपघाताचे कारण शोधून काढण्यासाठी जगभरातील या विमानांची उड्डाणे तात्पुरती थांबवण्यात आली होती. एफ-३५ हे अमेरिकेमध्ये विकसित झालेले आजच्या घडीचे जगातील सर्वात प्रगत फायटर विमान आहे. चीनची वाढती लष्करी ताकत लक्षात घेऊन जपानने आपल्या हवाई दलाला सक्षम करण्यासाठी अमेरिकेकडून एफ-३५ विमाने विकत घेतली आहेत.