जपानच्या एका कंपनीने पृथ्वीवरील ऊर्जेच्या समस्येवर वेगळा उपाय शोधला असून चंद्राच्या विषुववृत्तावर सौर पट्टय़ांचा संच लावून तेथे सूर्यप्रकाशापासून वीज निर्माण करून ती पृथ्वीवर पाठवण्याचा प्रस्ताव मांडला आहे. ल्युना रिंग असे या प्रकल्पाचे नाव असून शिमीझू कार्पोरेशनने तो मांडला आहे.
या कंपनीच्या मते ही यंत्रणा १३०० टेरावॉट इतकी वीज पृथ्वीवर पाठवू शकेल व त्या सौरपट्टय़ांच्या संचाची चंद्राच्या विषुववृत्तावरील उभारणी इ.स. २०३५ मध्ये सुरू  केली जाईल. फिजीर्स ओआरजी या संकेतस्थळावर हे वृत्त देण्यात आले आहे. या यंत्रणेत चंद्राच्या विषुववृत्तीय प्रदेशात ११,००० कि.मी इतक्या विस्तीर्ण भागात सौर घट उभारले जाणार असून त्यामुळे वीजनिर्मिती मोठय़ा प्रमाणात व सातत्याने होणार आहे. या सौर घटांच्या पट्टय़ाची रुंदी काही किलोमीटर ते ४०० किलोमीटर दरम्यान असू शकेल असे सांगण्यात आले. पृथ्वीवरून दूरनियंत्रणाच्या माध्यमातून यंत्रमानवांना चंद्रावर चोवीस तास कामाला लावले जाईल. ते तेथे बांधकाम करतील. काँक्रिटवर सौरपट्टय़ा बसवल्या जातील व त्या वायर्सनी सूक्ष्मलहरी व लेसर प्रसारण केंद्रांना जोडल्या जातील. चंद्रावरून सोडलेले ऊर्जा किरण थेट पृथ्वीवरील ग्रहण केंद्रात घेतले जातील व त्यामुळे आकाशात ढग असले, खराब हवामान असले, तरी चंद्रावरून अक्षय्य सौर ऊर्जा आपल्याला मिळेल. उच्च ऊर्जेचे लेसर किरण चंद्रावरील २० कि.मी. व्यास असलेल्या अँटेनावर ग्रहण केल्यानंतर रेडिओ बिकन यंत्रणेच्या माध्यमातून पृथ्वीवर पाठवले जातील. यासाठी लागणारी सामग्री व सौर पट्टय़ाची निगा दुरुस्ती यंत्रणा पृथ्वीवरून पाठवल्या जातील. चंद्रावरील घटकांपासून सौर घट तयार करून ते बसवले जातील.
ही वेळ का आली?
जपानमध्ये मार्च २०११ मध्ये सुनामी व भूकंपामुळे अणुऊर्जा प्रकल्प बंद करण्याची वेळ आली, त्यामुळे वीज कोठून मिळवायची याचे पर्याय वैज्ञानिक शोधत आहेत. या प्रकल्पात नेमका किती खर्च अपेक्षित आहे याचा उल्लेख करण्यात आलेला नाही. इतक्या लांब अंतरावर असलेल्या चंद्रावर अशा प्रकारची यंत्रणा उभारणे हे नक्कीच खर्चिक काम असणार हे उघड आहे.