जपानच्या अंतराळ संशोधन संस्थेचा एक आगळावेगळा प्रयत्न यशस्वी झाला आहे. जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सीने (जेएएक्सए) चक्क एका धुमकेतूवर आपले रोव्हर प्रकारातील दोन जुळी यानं उतरवली आहे. यासंदर्भात जेएएक्सएने ट्विटवरून माहिती दिली. विशेष म्हणजेच धूमकेतूवरील काही फोटोही या यानाने पाठवले असून तेही जेएएक्सएने ट्विट केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जपानच्या अंतराळ संस्थेने चार वर्षापूर्वी आपली हायाबुसा टू नावाची यानं अंतराळामध्ये सोडली होती. चार वर्षांच्या मेहनतीनंतर अखेर ही यानं नियोजित रोयगू या धूमकेतूवर यशस्वीरित्या उतरवली आहेत. रोव्हर प्रकारचे कोणतेही यान धूमकेतूवर उतरण्याची ही पहिलीच वेळ असल्याने या मोहिमेला विशेष महत्व आहे. याच संदर्भात जारी केलेल्या माहितीनुसार धूमकेतूवर उतरलेली दोन्ही रोव्हर यानं सुस्थितीमध्ये आहेत. दोन्ही यानांकडून फोटो आणि माहिती योग्य पद्धतीने मिळत आहे. या दोघांपैकी एक यान या धूमकेतूवर वेगवेगळ्या जागी फिरत आहे असून एक यान एकाच जागी आहे.

मात्र या धूमकेतूवर गुरुत्वाकर्षण खूपच कमी असल्याने या यानांना पृष्ठभागावर टिकून राहणे कठीण जात आहे. म्हणूनच इतर ग्रहांवरील रोव्हर यानांप्रमाणे ही याने धूमकेतूवर सतत चालू शकत नाही. एका जागेवरून दुसऱ्या जागी जाण्यासाठी या यानांना उड्या मारत पुढे जावे लागत आहे. त्यामुळेच या यानांनी पाठवलेले फोटो अगदीच भन्नाट आले आहेत.

या यानांनी धूमकेतूच्या पृष्ठभागावर उड्या मारताना हे फोटो काढल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे.

या वरील फोटोमध्ये सूर्यप्रकाश दिसत आहे

तर हा फोटो यान जेव्हा स्थिर होते किंवा काही क्षणांसाठी रोयगूच्या पृष्ठभागावर स्थिरावले होते त्यावेळी काढला आहे.

अशाप्रकारे धूमकेतूवर एखादे यान उतरण्याची ही पहिलीच वेळ नसली तरी धूमकेतूवर उतरल्यानंतर अशाप्रकारे यशस्वीरित्या माहिती आणि फोटो पाठवण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळेच या फोटो आणि माहितीच्या आधारे आजपर्यंत केवळ धूमकेतूंच्या निरीक्षणांवर आधारित संशोधनाला माहितीचे पाठबळ मिळणार आहे. सध्यातरी या यानांकडून येणारे फोटो आणि माहिती योग्य पद्धतीने येत असून त्यामधून अनेक नवीन गोष्ट पहिल्यांदाच समोर येतील अशी अपेक्षा वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Japans rovers landed successfully on asteroid send crazy pictures
First published on: 25-09-2018 at 13:14 IST