भाजपचे माजी नेते जसवंत सिंह यांची प्रकृती खूपच गंभीर बनली असून ते कोमात गेले आहेत. लष्कराच्या रुग्णालयात त्यांना शुक्रवारी सकाळी दाखल करण्यात आले आहे. ते घरातच डोक्यावर पडले व त्यांना गंभीर इजा झाली आहे. त्यांना प्राणरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले असून त्यांच्यावर डॉक्टरांचे सतत लक्ष आहे.
मेंदूरोगतज्ज्ञ व आपत्कालीन सेवा तज्ज्ञ त्यांच्यावर उपचार करीत आहेत असे संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे. जीवरक्षक डिकॉम्प्रेसिव्ह हेमिक्रॅनीक्टॉमी ही शस्त्रक्रिया त्यांच्यावर करण्यात आली.
जसवंत सिंह हे ७६ वर्षांचे असून त्यांना आज पहाटे रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना घरात बेशुद्ध पडलेले पाहून रुग्णालयात आणले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जसवंत सिंह यांच्या कुटुंबीयांशी बोलून त्यांना लवकर बरे वाटावे अशी अपेक्षा व्यक्त केली. रुग्णालयात आणल्यानंतर ते कोमात गेल्याचे दिसून आले, त्यामुळे सीटीस्कॅन करून मेंदूत निर्माण झालेला दोष शोधून काढण्यात आला व डिकॉम्प्रेसिव्ह हेमिक्रॅनीक्टॉमी ही शस्त्रक्रिया करण्यात आली. जसवंत सिंह यांनी अर्थमंत्री व परराष्ट्रमंत्रिपद भूषवले असून त्यांना लोकसभा निवडणुकीत राजस्थानातील बारमेर मतदारसंघात बंडखोरी केल्याने पक्षातून काढण्यात आले होते व त्यांच्याऐवजी भाजपने कर्नल सोनाराम चौधरी यांना उभे केले होते.