सुप्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांना रिचर्ड डॉकिन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मानवी विकासाला प्रोत्साहन देणे, मानवी मूल्य अबाधित राहावे यासाठी प्रयत्न करणे आणि विचारक्षमता यासाठी अख्तर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा सन्मान प्राप्त करणारे जावेद अख्तर पहिले भारतीय ठरले आहेत. यापूर्वी हा पुरस्कार अमेरिकेतील विनोदवीर बिल मगर आणि दार्शविक क्रिस्टोफर हिचेंस यांना देण्यात आला होता.

७५ वर्षीय जावेद अख्तर ट्विटरवर सक्रीय असतात. अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर ते सोशल मीडियाद्वारे मत व्यक्त करताना दिसतात. नुकतंच त्यांनी सुधारित नागरिकत्व कायदा (CAA), तबलिगी जमात, इस्लामोफोबिया यावरुन सडेतोड मत व्यक्त केले होते. जावेद अख्तर यांना पद्मश्री, पद्मभूषण, साहित्य अकादमी तसेच पाच राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. आता त्यांना २०२०मधील रिचर्ड डॉकिन्स पुरस्कार देण्यात आला आहे.

कोणाला देण्यात येतो हा पुरस्कार?
रिचर्ड डॉकिन्स पुरस्कार बायोलॉजिस्ट रिचर्ड डॉकिन्स यांच्या नावाने सुरु करण्यात आला होता. हा पुरस्कार अशा लोकांना दिला जातो जे लोक धर्मनिरपेक्षता, तर्कवाद यावर बिनधास्तपणे आपले मत मांडतात. हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. २०१९ पर्यंत हा पुरस्कार एथीस्ट अलाइंस ऑफ अमेरिका देत होती. पण जुलै २०१९मध्ये हा पुरस्कार सेंटर फॉर इन्क्वायरीकडे देण्यात आला.