राज्यसभेतून निवृत्त होत असलेले खासदार आणि ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी काल राज्यसभेत असदुद्दीन ओवेसींच्या वक्तव्यावर सडकून टीका केली. ओवेसींनी उदगीर येथील सभेत आपण ‘कदापि भारत माता की जय’ असे म्हणणार नाही, असे वादग्रस्त विधान केले होते. भारतीय राज्यघटनेनुसार माझ्यावर ‘भारत माता की जय’ म्हणण्याचे बंधन नाही, असेदेखील त्यांनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर घटना तर तुम्हाला शेरवानी व टोपी घालण्याचेही बंधन ठेवत नाही, असे सांगत जावेद अख्तर यांनी ओवेसींना अप्रत्यक्षपणे उत्तर दिले. भारत माता की जय’ म्हणणे कर्तव्य नव्हे, तो आपला अधिकार असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले. तसेच अख्तर यांनी सभागृहात त्रिवार “भारतमाता की जय‘च्या घोषणा दिल्या.
कामकाजात वारंवार अडथळे आणणे व धार्मिक ध्रुवीकरण देशाला पुढे नेणार नाही, तर धर्मनिरपेक्षतेची शिकवण देणारी राज्यघटनाच पुढे नेईल. तसेच आगामी निवडणुकांचा विचार बाजूला ठेवून देशाचा विचार केला जावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. राज्यसभेतून या वेळी किमान ७४ सदस्य निवृत्त होत आहेत. त्यातील पहिल्या १० ते १२ जणांच्या फळीला काल सभागृहातून निरोप दिला गेला. अख्तर, अय्यर, केपीएस गिल, टी. एन. सीमा, भालचंद्र मुणगेकर, विमला कश्‍यप सूद आदींनी यावेळी भावना व्यक्त केल्या.