‘दिल्लीतील हिंसाचार वाढत असून कपिल मिश्रांसारख्या सगळ्यांचीच पितळं उघडी पडत आहेत’, असं म्हणत चित्रपट गीतकार जावेद अख्तर दिल्लीत सुरु असलेल्या हिंसाचारावर व्यक्त झाले आहेत. गेल्या दोन दिवसापासून दिल्लीमध्ये सीएए विरोधक आणि सीएए समर्थक यांच्यात हिंसाचार सुरु आहे. सोमवारी दोन्ही गट भिडल्यानंतर दिल्लीत हिंसेचा उद्रेक झाला. दिल्लीतील जाफराबाद, मौजपुरी, भजनपुरा,चांदबाग आणि अन्य बऱ्याच ठिकाणी प्रचंड दगडफेक झाली. हे प्रकरण हिंसक वळण घेत असल्यामुळे देशभरात याचीच चर्चा होत आहे.

संतापलेल्या सीएए विरोधक आणि सीएए समर्थक या दोन्ही गटांनी परिसरातील दुकानं, वाहनं सार्वजनिक मालमत्तांना लक्ष्य करत जाळपोळ केली. या सगळ्या हिंसाचारात दिल्लीतील कायदा सुव्यवस्था देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे. एका पोलिसासह सात जणांचे बळी घेणाऱ्या या हिंसाचाराला भाजपा नेते कपिल मिश्रा यांना जबाबदार ठरवलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर जावेद अख्तर यांनी ट्विट केलं आहे.

“दिल्लीमधील हिंसाचाराचं प्रमाण वाढताना दिसत आहे. कपिल मिश्रांसारख्या सगळ्यांचीच पितळं उघडी पडत आहेत. दिल्लीत सध्या जे काही सुरु आहे ते सीएएला विरोध करणाऱ्यांमुळेच होत असल्याचं सध्या भासविण्यात येत आहे. त्यामुळे काही दिवसातच दिल्ली पोलीस या प्रकरणाचा छडा लावतील”, असं ट्विट जावेद अख्तर यांनी केलं आहे. जावेद अख्तर यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चांगलचं चर्चिलं जात आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने सुधारित कायदा नागरिकत्व कायदा लागू केला. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात एनआरसी लागू करणार असल्याचं सांगितलं. या दोन्ही कायद्याविरोधात दिल्लीतील शाहीन बागमध्ये मुस्लीम महिलांनी आंदोलन सुरू केलं. शाहीन बागनंतर महिलांनी जाफराबाद मेट्रो स्टेशन परिसरात आंदोलन सुरू केलं. या आंदोलनाला भाजपाचे नेते कपिल मिश्रा यांनी विरोध केला. पुन्हा शाहीन बाग होऊ देणार नाही, असं म्हणत त्यांनी याबद्दल ट्विटरवरून विरोध केला होता. त्यानंतर गेल्या तीन दिवसात जाफराबाद, मौजपुरी परिसरात शनिवारी सीएए विरोधात महिलांनी आंदोलन सुरू केलं. त्यानंतर रविवारी याठिकाणी दगडफेक करण्यात आली. भाजपाचे नेते कपिल मिश्रा यांनी सीएए विरोधी आंदोलनाविरोधात याच परिसरात रॅली काढली होती. त्यावेळी ही दगडफेक झाली. मात्र, पोलिसांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली. सोमवारी या दोन्ही गटातील वाद विकोपाला गेला. या संपूर्ण हिंसाचारात एका पोलिसासह सात जणांचा बळी गेला आहे. या हिंसाचाराचा फटका मेट्रोलाही बसला. तसेच अनेक भागात संचारबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. मंगळवारी दिल्लीत बैठकांचा धडका सुरू आहे.