ती एक सुंदर नृत्यांगना आहे. उत्तर प्रदेशच्या वेगवेगळया शहरात लग्न सोहळयांमध्ये ती नृत्याचे कार्यक्रम सादर करायची. अगदी काल-परवापर्यंत ती आपल्या नृत्याने लोकांची मने जिंकून घ्यायची. पण त्याच हीना देवीचा आज आयुष्याशी संघर्ष सुरु आहे. ३० नोव्हेंबरला एका लग्न सोहळयात कार्यक्रम सादर करत असताना गावच्या प्रमुखाने तिच्यावर चेहऱ्यावर गोळी झाडली. ज्यामध्ये तिच्या जबडयाचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर हीना देवीचे आयुष्य बदलून गेले.

हीना देवीचा चेहरा पुन्हा पूर्वीसारखा पूर्ववत करण्यासाठी तिच्यावर वेगवेगळया शस्त्रक्रिया कराव्या लागणार आहेत. हीना देवी आता रुग्णालयात असून, रोजच्या रोज रुग्णालयाच्या बिलाचा आकडा वाढत आहे. उपचारांचा खर्च लक्षात घेता तिला आतापर्यंत मिळालेली मदत तुटपुंजीच आहे.

“हीनाला गोळी लागताच आम्ही तिला अलाहाबादच्या स्वरुप राणी रुग्णालयात घेऊन गेलो. पण रविवारच दिवस असल्याने तिथे सर्जन नसल्याचे आम्हाला सांगण्यात आले. आम्ही लगेच तिला लखनऊ येथील रुग्णालयात हलवले. पोलिसांकडूनही आम्हाला काही मदत मिळाली नाही” असे राधाने सांगितले. हीनावर गोळीबार पाहणाऱ्या प्रत्यक्षदर्शींपैंकी ती एक आहे.हीनावर शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर फिरोज खान म्हणाले की, “गोळी लागून जबडयाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.

हीनाला पूर्णपणे बरे व्हायला काही महिने लागतील.” हीनावर पुढची शस्त्रक्रिया सहा महिन्यांनी होईल. आतापर्यंत तिच्या उपचारावर सात लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. यासाठी कुटुंबियांना गावकऱ्यांनी आणि नातेवाईकांनी आर्थिक मदत केली. ‘त्या एका गोळीने आम्हा नऊ जणांना मारले’ अशी प्रतिक्रिया हीनाच्या बहिणीने दिली. हीना विवाहित आहे. वर्षभरापूर्वीच तिचे लग्न झाले होते.

नेमकं काय घडलं
लग्न सोहळयात नृत्य थांबवलं म्हणून हीना देवी यांच्यावर गोळी झाडण्यात आली. उत्तर प्रदेशच्या चित्रकूटमध्ये ही धक्कादायक घटना घडली होती. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले. जखमी महिला डान्सिंग ग्रुपची सदस्य होती. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ बनवण्यात आला.

महिलेने नृत्य थांबवल्यानंतर दारुच्या नशेत असलेल्या एक व्यक्तीचे “गोली चल जायेगी” हे शब्द ऐकू येतात. भय्या, ‘आप गोली चलाही दो’ असे एक व्यक्ती बोलतो आणि तितक्यात महिलेवर गोळी झाडली जाते. अचानक एकाएकी घडलेल्या घटनेने सर्वचजण स्तब्ध होऊन जातात.

एक डिसेंबरचा हा व्हिडीओ असून गावच्या प्रमुखाच्या मुलीच्या लग्नसोहळयात डान्सिंग ग्रुप कार्यक्रम सादर करताना ही घटना घडली. गावच्या प्रमुखाच्या कुटुंबातील सदस्यानेच हा गोळीबार केला.