X

“नरेंद्र मोदी इंचार्ज आहेत, जवाहरलाल नेहरु नाही,” प्रियंका गांधी संतापल्या

"केंद्र सरकार इतर कोणावर आरोप ढकलू शकत नाही"

देशात आलेल्या करोनाच्या दुसऱ्या लाटेवरुन काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणावरही त्यांनी नाराजी जाहीर केली आहे. केंद्र सरकार दुसऱ्या कोणावर आरोप ढकलू शकत नाही अशा शब्दांत त्यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सुनावलं आहे. देश संकटात असताना विरोधकांच्या सूचनांचा स्वीकार करायला हवा होता असंही मत त्यांनी व्यक्त केलं.

“लसी परदेशात पाठवल्या म्हणूनच आपल्याकडेच तुटवडा”; प्रियंका गांधी मोदी सरकारवर संतापल्या

“केंद्र सरकार इतर कोणावर आरोप ढकलू शकत नाही. जवाहरलाल नेहरु इंचार्ज नाहीत, नरेंद्र मोदी आहेत. पंतप्रधानांनी प्रत्येक भारतीयाचं रक्षण केलं पाहिजे,” असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे.

“राजकारणामुळे विरोधकांच्या महत्वाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करण्यात आलं. देश संकटात असताना या सूचनांचा स्वीकार करायला हवा होता,” असं मत प्रियंका गांधी यांनी व्यक्त केलं. मोदी सरकारकडे दूरदृष्टी नसल्याने भारत लस आयातदार बनला आहे. करोना लसीकरणाचं धोरण भेदभाव करणारं आहे अशी टीका यावेळी त्यांनी केली. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, “करोना महामारीत लोकांचा जीव वाचवण्यासाठी जे मुद्दे उचलण्याची गरज आहे ते सर्व मुद्द काँग्रेस उचलणार मग त्यासाठी सरकारने त्यांच्यावर कोणताही ठपका ठेवला तरी चालेल”.

“लसी परदेशात पाठवल्या म्हणूनच आपल्याकडेच तुटवडा”
“आज देशभरातून बेड्स्, ऑक्सिजन, रेमडेसिवीर, व्हेंटिलेटरची कमतरता असल्याचे रिपोर्ट येत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान आपल्याकडे तयारीसाठी खूप वेळ होता. आपला देश ऑक्सिजनची निर्मिती करणारा सर्वात मोठा देश आहे. मग ऑक्सिजनची कमतरता का जाणवत आहे. कारण त्याची वाहतूक करण्याची सुविधा तयार करण्यात आलेली नाही,” अशी टीका प्रियंका गांधी यांनी याआधी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत केली.

“तुमच्याकडे आठ ते नऊ महिने होते. दुसरी लाट येणार सांगत असतानाही तुम्ही दुर्लक्ष केलं. युद्धपातळीवर काम करत तुम्ही सुविधा निर्माण करु शकत होता. आज देशात फक्त २००० ट्रक ऑक्सिजनची वाहतूक करु शकतात. देशात ऑक्सिजन आहे, पण जिथे पोहचण्याची गरज आहे पोहोचत नाही,” अशी खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली.

“रेमडेसिवीरसाठी लोक वणवण फिरत आहेत. गेल्या सहा महिन्यात १० लाखांहून अधिक रेमडेसिवीरची निर्यात करण्यात आली. सरकारने गेल्या तीन महिन्यात सहा कोटी लसींची निर्यात केली. त्याचवेळी देशात तीन ते चार कोटी लोकांना लस देण्यात आली. तुम्ही देशवासियांना प्राधान्य का दिलं नाही? कारण तुम्ही प्रसिद्धीत व्यस्त आहात. मॉरिशिअस, नेपाळला लस जात असल्याचं आम्ही टीव्हीवर पाहत होतो. तुम्ही सहा कोटी लस निर्यात केल्या आणि देशवासियांना तीन ते चार कोटी लस दिल्या. योग्य धोरण नसल्यानेच आज तुटवडा जाणवत आहे,” अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली आहे.

 

23
READ IN APP
X