26 November 2020

News Flash

पाकिस्तानच्या कुरापती सुरूच; महाराष्ट्राच्या सुपुत्राला काश्मिरात वीरमरण

मराठा बटालियनमध्ये होते कार्यरत

शहीद जवान संग्राम पाटील. (छायाचित्र/एएनआय)

सीमेपलिकडून पाकिस्तानच्या कुरापती सुरूच असून, पाक लष्कराने शनिवारी पुन्हा शस्त्रसंधी उधळून लावत गोळीबार केला. पाक लष्कराने केलेल्या गोळीबारात महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण आलं. शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पाकिस्ताननं केलेल्या गोळीबारात कोल्हापूर जिल्ह्यातील जवान संग्राम शिवाजी पाटील शहीद झाले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून पाककडून सीमेवर कुरापती सुरू आहेत. भारतीय लष्कराकडून पाकला चोख प्रत्युत्तर दिलं जात असून, शनिवारी सकाळी पाक लष्कराने पुन्हा एकदा शस्त्रसंधी धुडकावून लावत अंदाधुंद गोळीबार केला. राजौरी जिल्ह्यातील नोशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्यानं गोळीबार केला. यात कोल्हापूर जिल्ह्यातील जवान संग्राम शिवाजी पाटील शहीद झाले.

शहीद जवान संग्राम पाटील हे कोल्हापूर जिल्ह्यातील निगवे खालसा गावातील रहिवाशी असून, अठरा वर्षांपूर्वी ते लष्करात दाखल झाले होते. सैन्यदलातील ‘१६ मराठा बटालियन’मध्ये ते कार्यरत होते. संग्राम यांची १७ वर्ष सेवेची मुदत गेल्या वर्षी संपली होती. त्यानंतर त्यांनी दोन वर्ष मुदत वाढवून घेतली होती.

संग्राम पाटील शहीद झाल्याचं वृत्त काही वेळातच कोल्हापुरात येऊन धडकलं. त्यानंतर सर्वत्र शोक व्यक्त केला जात असून, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. “जम्मू-काश्मीरमध्ये राजौरी इथं पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्यात कोल्हापूर जिल्ह्यातील निगवे खालसा येथील जवान संग्राम पाटील यांना वीरगती प्राप्त झाली. संग्राम पाटील यांचं हे बलिदान देश कधीही विसरणार नाही. देशाच्या या वीर सुपुत्राला माझी भावपूर्ण श्रद्धांजली!,” अशा शब्दात रोहित पवार यांनी अभिवादन केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2020 1:13 pm

Web Title: jawan patil sangram shivaji lost his life in ceasefire violation by pakistan bmh 90
Next Stories
1 अमेरिका : डोनाल्ड ट्रम्प यांच्या मोठ्या मुलाला झाली करोनाची लागण
2 Coronavirus update : देशात २४ तासांत ४६ हजार रुग्णांची वाढ
3 काँग्रेसचा कोणी माय-बाप शिल्लक नाही, मत कोणालाही द्या सरकार भाजपाचंचं बनतं : केजरीवाल
Just Now!
X