पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत दिवाळी साजरी केल्यानंतर, जम्मू- काश्मीरच्या राजौरी जिल्ह्य़ात नियंत्रण रेषेचे रक्षण करणारे लष्करी जवान उत्साही दिसत होते. पंतप्रधानांनी आपली अचानक भेट घेतल्यामुळे आपण आनंदी असून आपल्याला त्याचा अभिमान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.

काश्मीरला विशेष दर्जा देणारा अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आल्यानंतर मोदी यांनी जम्मू भागातील या सीमावर्ती जिल्ह्य़ाला पहिल्यांदाच भेट दिली. तोफखाना दिवसाच्या कार्यक्रमानिमित्त त्यांची ही भेट होती. पंतप्रधानांनी शहरातील बी.जी. ब्रिगेड मुख्यालयात सैनिकांशी संवाद साधला.

उल्हसित दिसणाऱ्या सौनिकांपैकी बहुतेकांनी पंतप्रधानांच्या भेटीबाबत भाष्य करणे टाळले, मात्र केवळ काहीजण कार्यक्रमस्थळावरून जाताना घाईघाईत पत्रकारांशी बोलले.

‘पंतप्रधानांना भेटण्याची आम्ही कधी कल्पनाही केली नव्हती. त्यांच्या या भेटीमुळे आमची दिवाळी अविस्मरणीय ठरली आहे’, असे मोदी येथून निघून गेल्यानंतर एका सैनिकाने पत्रकारांना सांगितले. ‘मोदी यांची भेट ही आमच्यासाठी अतिशय अनपेक्षित होती आणि त्यांना भेटून आम्हाला आनंद व अभिमान वाटत आहे’, असे तो म्हणाला.

दिवाळीचा सण आपल्यासोबत साजरा केल्याबद्दल पंतप्रधानांची प्रशंसा करताना दुसरा एक सैनिक म्हणाला की, त्यांच्या या कृतीमुळे देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी दिवसरात्र काम करणाऱ्या सैनिकांचे मनोधैर्य नक्कीच वाढले आहे.

पंतप्रधान अतिशय चांगले आहेत. देशाच्या सीमांचे रक्षण करण्यातील आमच्या भूमिकेसाठी त्यांनी आमचे कौतुक केले. त्यांचे सरकार आमच्या पाठीशी असल्याची. तसेच आमच्या राष्ट्राप्रति सेवेची पोचपावती म्हणून आमच्यासाठी शक्य ते सर्व करण्याची हमी त्यांनी दिली, असे हा सैनिक म्हणाला.

२०१४ पासून मोदी यांची तिसरी भेट

काश्मीर या सीमावर्ती राज्यात सैनिकांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी २०१४ सालापासून मोदी यांनी या राज्याला दिलेली ही तिसरी भेट होती.

२०१४ साली सर्वप्रथम पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर, सीमांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांशी दिवाळीनिमित्त संवाद साधण्याची प्रथा मोदी यांनी सुरू केली. त्या वर्षीची दिवाळी त्यांनी लडाख भागातील सियाचेन येथे जवानांसोबत साजरी केली होती, तसेच श्रीनगरच्या पूरग्रस्तांना भेट दिली होती.

२०१७ साली मोदी यांनी उत्तर काश्मीरमधील गुरेझ सेक्टरला भेट देऊन, तेथे तैनात असलेल्या सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली होती. २०१५ सालच्या दिवाळीत त्यांनी पंजाब सीमेला भेट दिली. १९६५च्या भारत- पाक युद्धाला ५० वर्षे पूर्ण झाल्याचे निमित्त त्याला होते. त्याच्या पुढच्या वर्षी मोदी हे हिमाचल प्रदेशला गेले. तेथे त्यांनी एका सीमा चौकीवर भारत- तिबेट सीमा पोलिसांच्या कर्मचाऱ्यांसोबत वेळ घालवला. २०१८ साली त्यांनी दिवाळीचा सण लष्कराच्या व आयटीबीपीच्या कर्मचाऱ्यांसोबत उत्तराखंडमधील भारत- चीन सीमेजवळील बर्फाच्छादित भागात साजरा केला होता.