भाजपा आमदार कुलदीप सिंह सेंगर आरोपी असणाऱ्या उत्तर प्रदेशच्या उन्नाव येथील बलात्काराच्या घटनेतील पीडित तरुणी अपघातात गंभीर जखमी झाली. या अपघातात पीडितेच्या काकू आणि अन्य एका नातेवाईकाचा मृत्यू झाला, तर तिचे वकील देखील अपघातात गंभीर जखमी आहेत. पण हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय पीडितेच्या कुटुंबीयांकडून आणि विरोधी पक्षांकडून व्यक्त करण्यात येत आहे, तसंच सीबीआय चौकशीची मागणी केली जातेय. याविरोधात मंगळवारी समाजवादी पार्टी आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी दिल्लीत आंदोलन केलं. या आंदोलनात सहभागी झालेल्या जया बच्चन यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. याच फोटोमुळे त्यांच्यावर टीकासुद्धा होत आहे.

सोशल मीडियावरील व्हायरल फोटोंमध्ये जया बच्चन या हसताना पाहायला मिळत आहेत. याच कारणामुळे त्यांना ट्रोल केले जात आहे. गंभीर मुद्द्यावर आंदोलन करत असताना अशाप्रकारे हसणे कितपत योग्य आहे असा सवाल नेटकऱ्यांनी केला आहे. तर हे आंदोलन न्यायासाठी नाही तर राजकीय स्वार्थासाठी केला जात असल्याचा आरोपही काहींनी केला आहे.

रविवारी(दि.28) झालेल्या अपघातात एका बेदरकार ट्रकने उन्नाव बलात्कार पीडितेच्या कारला जोरदार धडक दिली. कारमध्ये त्यावेळी पीडिता, तिचे नातेवाईक आणि वकील होते. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये पीडितेच्या काकू आणि अन्य एक नातेवाईक ठार झाले, तर पीडिता आणि तिचे वकील गंभीर जखमी झाले आहेत. दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यासर्व घडामोडींमुळे पीडितेसोबत होणाऱ्या या घटना अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.