श्रीलंकेच्या नौदलाकडून भर समुद्रात भारतीय मच्छीमारांना पकडण्याचे प्रकार अद्यापही सुरू असून त्याविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
श्रीलंकेने अलीकडेच ११ भारतीय मच्छीमारांना अटक केली असून त्यामुळे जयललिता संतप्त झाल्या आहेत. श्रीलंकेच्या ताब्यात असलेल्या सर्व भारतीय मच्छीमारांची सुटका करण्यासाठी मोदी यांनी वैयक्तिक पातळीवर हस्तक्षेप करावा, अशी मागणी जयललिता यांनी मोदी यांना पत्र पाठवून केली आहे.
अलीकडेच पकडण्यात आलेले एक मच्छीमार पुडूकोट्टाई येथील असून त्यापूर्वी अन्य ५३ मच्छीमार आणि त्यांच्या १२ बोटी १८ आणि १९ जून रोजी पकडण्यात आल्या आहेत, सध्या हे सर्व जण श्रीलंकेतील कोठडीत खितपत पडले आहेत, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील करार घटनात्मक नसल्याचे नमूद करून जयललिता यांनी भारतीय मच्छीमारांच्या पारंपरिक हक्कांचे जतन करण्यासाठी पावले उचलावी, अशी मागणी केली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 25, 2014 12:41 pm