कथित संरक्षण सौद्याशी संबंधित प्रकरणात समता पक्षाच्या माजी अध्यक्ष जया जेटली व इतर दोघांनी देशाच्या संपूर्ण संरक्षण व्यवस्थेशी समझोता केला असे सांगून दिल्लीच्या एका न्यायालयाने या तिघांना गुरुवारी भ्रष्टाचारासाठी ४ वर्षे कैदेची शिक्षा सुनावली.

सीबीआयचे विशेष न्यायाधीश विरेंदर भट यांनी या प्रकरणात जया जेटली, त्यांचे पक्षातील माजी सहकारी गोपाल पचेरवाल आणि सेवानिवृत्त मेजर जनरल ए.पी. मुरगई यांना ४ वर्षांची कैद सुनावली, अशी माहिती मुरगई यांच्या वकिलांनी दिली.

बंद कक्षात केलेल्या सुनावणीत न्यायालयाने तिन्ही दोषींना प्रत्येकी १ लाख रुपयांचा दंड ठोठावला आणि त्यांना गुरुवारी सायंकाळपर्यंत आपल्यापुढे शरण येण्यास सांगितले. मात्र नंतर दिल्ली उच्च न्यायालयाने जेटलींच्या शिक्षेच्या आदेशाला स्थगिती दिली.

हँड-हेल्ड थर्मल इमेजर्सच्या कथित खरेदीत भ्रष्टाचार व गुन्हेगारी स्वरूपाचा कट यासाठी न्यायालयाने २१ जुलैला ३ आरोपींना दोषी ठरवले होते. ‘तहलका’ या न्यूज पोर्टलने जानेवारी २००१ मध्ये केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून हे प्रकरण उद्भवले होते.

दिल्लीत डिसेंबर २००० ते जानेवारी २००१ या दरम्यान घडलेल्या या गुन्ह्य़ात नंतर माफीचा साक्षीदार झालेल्या सुरेंद्र कुमार सुरेखा यांच्यासह सर्व ३ आरोपी सहभागी होते. जेटली यांनी वेस्टलँड इंटरनॅशनल नावाच्या बनावट कंपनीचा प्रतिनिधी मॅथ्यू सॅम्युएल याच्याकडून २ लाखांची लाच घेतली, तर मुरगई यांना २० हजार रुपये मिळाले, याचा न्यायालयाने उल्लेख केला.

ही कंपनी प्रत्यक्षात कार्यरत आहे काय आणि भारतीय लष्करात वापरात आणायचे असलेले या कंपनीचे उत्पादन त्यायोग्य आहे काय याची पडताळणी न करता दोषींनी या बनावट कंपनीच्या प्रतिनिधीकडून पैसा घेतला, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

दोषी हे सर्वसामान्य व्यक्ती नव्हते, तर प्रतिष्ठा असलेले लोक होते. त्यांनी अज्ञानापोटी किंवा दबावाखाली हे कृत्य केले नव्हते. याउलट, विचारपूर्वक कट रचून त्यांनी हा गुन्हा केला. यामुळे देशाच्या संरक्षणावर गंभीर परिणाम होणार असल्याने हा अतिशय ‘गंभीर स्वरूपाचा गुन्हा’ आहे, असे मत न्यायालयाने व्यक्त केले.

शिक्षेला स्थगिती..

विशेष सीबीआय न्यायालयाने जया जेटली यांना सुनावलेल्या शिक्षेला दिल्ली उच्च न्यायालयाने नंतर स्थगिती दिली. आपल्याला दोषी ठरवणाऱ्या निकालाला व शिक्षेला आव्हान देणाऱ्या जेटली यांच्या याचिकेवर न्या. सुरेश कुमार कैत यांनी सीबीआयला बाजू मांडण्यास सांगितले, अशी माहिती जेटली यांचे वकील अभिजात यांनी दिली.