News Flash

जयललिता यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला

कोटय़वधी रुपयांच्या बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी अटकेत असलेल्या तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि अण्णा द्रमुक पक्षाच्या सर्वेसर्वा जे. जयललिता यांना मंगळवारी जामीन मिळू शकला नाही.

| September 30, 2014 11:44 am

कोटय़वधी रुपयांच्या बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी अटकेत असलेल्या तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि अण्णा द्रमुक पक्षाच्या सर्वेसर्वा जे. जयललिता यांना मंगळवारी जामीन मिळू शकला नाही. त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी कर्नाटक उच्च न्यायालयाने सहा ऑक्टोबपर्यंत पुढे ढकलली होती. मात्र जयललिता यांचे वकील राम जेठमलानी यांनी न्यायालयाच्या निबंधकांकडे धाव घेतल्याने बुधवारी सुनावणी होणार आहे.
६६.६५ कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जमविल्याप्रकरणी जयललिता यांच्यासोबत त्यांच्या तीन सहकारी एन. ससिकला, जे. इलावरसी आणि व्ही. एन. सुधाकरन यांना शनिवारी विशेष न्यायालयाने चार वष्रे तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात या शिक्षेविरोधात धाव घेतली. न्यायालयात जयललिता यांनी सर्वप्रथम जामिनासाठी अर्ज केला. न्यायालयाने या अर्जावरची सुनावणी ६ ऑक्टोबपर्यंत लांबणीवर टाकण्याचे मंगळवारी जाहीर केले. पण जेठमलानी यांनी तातडीच्या सुनावणीची मागणी केली. ‘‘गुन्हेगारी दंडसंहिता कलम ३८९ अन्वये जर एखाद्या प्रकरणी अपील प्रलंबित असेल तर जामीन देता येतो. कलम ३८९ अन्वये दोषी व्यक्तीविरोधात अपील प्रलंबित असेल तर न्यायालय शिक्षेला स्थगिती देऊ शकते. जर एखादी व्यक्ती तुरुंगात असेल तर तिला व्यक्तिगत जातमुचलक्यावर सोडता येते,’’ असा युक्तिवाद जेठमलानी यांनी केला. त्यानंतर न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी. एच. वाघेला यांनी जयललिता यांच्या जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी करण्याचे मान्य केले.
जयललितांच्या पाठीशी कॉलिवूड
एकेकाळी तामिळ चित्रपटसृष्टी गाजविणाऱ्या जे. जयललिता या जरी तुरुंगात गेल्या असल्या तरी त्यांना कॉलिवूड म्हणजेच तामिळ चित्रपटसृष्टीने पाठिंबा दिला आहे. त्यासाठी कॉलिवूडच्या काही कलावंतांनी मंगळवारी एक दिवसांचे ‘मूक उपोषण’ करून निषेध नोंदविला. प्रसिद्ध अभिनेता आर. सरथ कुमार, आमदार असलेले दिग्दर्शक विक्रमन, लियाकत अली खान, एस. थानू आणि टी. सिवा हे या आंदोलनात सहभागी झाले होते. मंगळवारी सर्व चित्रपटांचे व दूरचित्रवाणी मालिकांचे चित्रीकरण थांबविण्यात आले होते, तर काही चित्रपटांचे खेळही रद्द करण्यात आले होते.
चौथ्या दिवशीही आंदोलने
जयललितांना अटक झाल्याने अण्णा द्रमुकच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी सलग चौथ्या दिवशी राज्यभर आंदोलने केली. चेन्नई, कोइंबतूर, सालेम, तिरुचिरापल्ली, कांचिपूरम या शहरांमध्ये कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करत या अटकेचा निषेध व्यक्त केला.
पोलिसाचा आत्मदहनाचा प्रयत्न
जयललिता यांना अटक झाल्याने चेन्नई येथील वेलमुरुगन नावाच्या एका पोलीस कॉन्स्टेबलने मंगळवारी आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलीस मुख्यालयासमोर वेलमुरुगनने जयललिताच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करत स्वत:वर रॉकेल ओतून घेतले. स्वत:ला पेटवत असतानाच अन्य पोलिसांनी त्याला अडविले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2014 11:44 am

Web Title: jaya to stay in jail as high court to hear jayalalithaas case on wednesday
टॅग : Jayalalithaa
Next Stories
1 चले साथ साथ: ‘केम छो’ म्हणत ओबामांनी केले मोदींचे स्वागत
2 डिझेल एक तर पेट्रोल पावणेदोन रुपयाने स्वस्त होण्याची शक्यता
3 जयललिता यांच्या जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी
Just Now!
X