तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी कावेरी नदीच्या खोऱ्यातील शेतकऱ्यांसाठी ५४.६५ कोटी रुपयांचा मदतनिधी जाहीर केला आहे. त्यानुसार प्रतिएकर ४ हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत. शेतकऱ्यांनी आधुनिक अवजारांचा वापर करून उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावा यासाठी ही मदत असणार आहे.
मागील चार वर्षांत कावेरीच्या खोऱ्यातील चार जिल्ह्य़ांतील गावांना १२ तास वीजपुरवठा करण्यात आला होता. आता जाहीर करण्यात आलेली मदत प्रतिएकर चार हजार रुपयांनुसार प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे जयललिता सरकारकडून सांगण्यात आले आहे. कृषीमंत्र्यांसह झालेल्या बैठकीनंतर जयललिता यांनी मदतनिधी जाहीर केला. त्या म्हणाल्या की, मेतूर धरणात पाणी कमतरता आहे. त्यामुळे कर्नाटककडून १० टीएमसी पाणी घ्यावे लागेल. कावेरीच्या खोऱ्यात पाऊस झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा आमचा प्रयत्न आहे.