येत्या वर्षांत तामीळनाडूत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी इतर पक्षांशी युती करण्याचे स्पष्ट संकेत अण्णा द्रमुक पक्षाच्या सर्वेसर्वा आणि राज्याच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी दिले. योग्य वेळी यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी पक्षाच्या सदस्यांना यावेळी सांगितले.
मागील विधानसभा निवडणुकीनंतर जयललिता यांनी इतर पक्षांशी युती करण्याची शक्यता सातत्याने फेटाळून लावली होती. पण, येत्या निवडणुकीसाठी इतर पक्षांची मदत घेण्याची घोषणा त्यांनी केल्यामुळे द्रविड राजकारणात नव्या समीकरणांच्या उदयाची शक्यता निर्माण झाली आहे. निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी कुठलीही विशेष व्यूहनिती आखण्यात आलेली नाही. ज्याप्रमाणे २००९च्या लोकसभा, तर २०११च्या विधानसभा निवडणुकीसाठी इतर पक्षांशी युती करण्यात आली होती, त्याचप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कुणाशी युती करायची, याचा निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. तामिळनाडूच्या राजकारणात एकटे पडलेल्या अण्णा द्रमुकसाठी हा निर्णय महत्वाचा ठरणारा आहे. कारण, मागील निवडणुकीनंतर अभिनेता विजयकांत याच्या देसीय मुरपक्कू द्रविड कळघम (डीएमडीके) पक्षाशी केलेली युती संपुष्टात आल्यानंतर जयललिता यांच्या सोबतीला कुठलाही प्रबळ प्रादेशिक पक्ष राहिलेला नाही. भाजपदेखील डीएमडीकेशी युती करण्यास उत्सुक असून त्याला राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटकपक्ष बनविण्यासाठी भाजपनेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत.