ज्ञात स्त्रोतापेक्षा अधिक संपत्ती बाळगल्याच्या कारणावरून शिक्षा भोगत असलेल्या व्ही.के. शशिकला यांनी तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्याबाबत खळबळजनक खुलासा केला आहे. स्वच्छतागृहात पडल्यानंतर जयललितांनी दि.२२ सप्टेंबर २०१६ रोजी रूग्णालयात दाखल होण्यास नकार दिला होता, अशी साक्ष शशिकला यांनी दिली आहे. जयललिता यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या सेवानिवृत्त न्यायाधीशांसमोर शशिकला यांनी ही नवीन माहिती दिली.

जयललिता या रूग्णालयात असताना चारवेळा व्हिडिओग्राफी करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले. ओ. पन्नीरसेल्वम आणि एम. तंबीदुरई यांच्यासह अण्णा द्रमुकच्या ज्येष्ठ नेत्यांनीही त्यांची भेट घेतली होती. या दोन्ही नेत्यांनी मात्र जयललिता यांच्याशी आम्हाला तीन महिने भेटू दिले नव्हते, असा दावा केला होता.

उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अरुमुघस्वामींकडे साक्ष नोंदवण्यात आली. या चौकशीदरम्यान जयललिता यांच्या आरोग्य आणि उपचाराबाबत बरेच प्रश्न विचारण्यात आल्याचे ‘एनडीटीव्ही इंडिया’ने म्हटले आहे.

शशिकला यांना भ्रष्टाचारप्रकरणी चार वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. रूग्णालयात नेताना जयललिता शुद्धीत होत्या. आपल्याला कुठे नेले जात आहे, असा प्रश्नही त्यांनी विचारला होता, असे त्या म्हणाल्या. जयललिता यांची तब्येत दि. २२ सप्टेंबरला बिघडली होती. त्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.