श्रीलंकेचे क्रिकेटपटू, पंच, अधिकारी आणि इतर कर्मचारी संघात नसले, तरच तामिळनाडूमध्ये इंडियन प्रिमिअर लीगच्या सामन्यांना परवानगी देण्यात येईल, असे तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी मंगळवारी स्पष्ट केले. श्रीलंकेमध्ये तामिळ नागरिकांवर होणाऱया अत्याचाराचा निषेध म्हणून हे पाऊल उचलले असल्याचे त्यांनी सांगितले.
श्रीलंकेतील सरकारकडून तेथील तामिळ नागरिकांवर होणाऱया अत्याचाराच्याविरोधात तामिळनाडूतील जनतेमध्ये सध्या निषेधाच्या आणि रागाच्या भावना आहेत. त्यामुळेच श्रीलंकेचे क्रिकेटपटू आणि इतर अधिकारी असलेले सामने तामिळनाडूमध्ये खेळू न देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे जयललिता यांनी सांगितले. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना त्यांनी पत्र लिहिले आहे. त्यामध्ये श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंना आणि इतरांना टीमच्या मालकांनी आपल्या संघात घेऊ नये, यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या माध्यमातून सूचना करण्याची मागणी करण्यात आलीये.
श्रीलंकेतील कोणताही क्रिकेटपटू, पंच, अधिकारी किंवा कर्मचारी सामन्यामध्ये सहभागी होत नसल्याचे आयोजकांनी लेखी लिहून दिल्यावरच आयपीएलच्या सामन्यांना तामिळनाडूमध्ये परवानगी देण्यात येईल, असे जयललिता यांनी स्पष्ट केले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 26, 2013 4:04 am