तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या मृत्यूबाबत अनेक शंका व्यक्त केल्या जात होत्या. त्या पार्श्वभूमीवर अपोलो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या पथकाने जयललिता यांच्या मृत्यूची कारणे सांगितली. जयललिता यांच्या मृत्यूमध्ये संशयास्पद असे काही नाही. अनेक अवयव निकामी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

जयललिता यांच्या मृत्यूसंदर्भात अनेक शंका व्यक्त केल्या जात होत्या. मद्रास उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनीही शंका व्यक्त केली होती. द्रमुकनेही उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत त्यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली होती. उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांमार्फत जयललितांच्या मृत्यूची चौकशी करून सत्य बाहेर काढावे. सरकारने माजी मुख्यमंत्री जयललिता यांना नेमके काय उपचार देण्यात आले याची सर्वंकष माहिती द्यावी. वैद्यकीय वार्तापत्रे, व्हिडिओ, छायाचित्रे जाहीर करण्यात यावीत, अशी मागणी द्रमुकने केली होती. स्टालिन यांनी जयललिता यांना देण्यात आलेल्या उपचारांबाबत श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली होती. जयललिता यांना २२ सप्टेंबरला रुग्णालयात दाखल केल्यापासून राज्य सरकारने कुठलीही अधिकृत माहिती दिली नव्हती, असे त्यांनी त्यावेळी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर जयललिता यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या पथकाने पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या मृत्यूची कारणे स्पष्ट केली. अनेक अवयव निकामी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला, असे डॉक्टरांनी सांगितले. जयललिता यांना रक्तात संसर्ग झाला होता. त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता, असे त्यांच्यावर उपचार करणारे इंग्लंड येथील डॉक्टर रिचर्ड बेले यांनी सांगितले.

रुग्णांचे छायाचित्र काढणे, त्यांची खासगी माहिती सार्वजनिक करणे योग्य नाही. आमच्या रुग्णालयात रुग्णालयांच्या खोलीत सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आलेले नाहीत. जरी कॅमेरे लावले असते तर त्याचे चित्रणही सार्वजनिक केले नसते, असेही बेले यांनी स्पष्ट केले. जयललिता यांच्या प्रकृतीविषयी शशिकला आणि सरकारी अधिकाऱ्यांना रोज माहिती दिली जात होती. जयललिता यांच्या प्रकृतीत सुधारणा होईल, अशी अपेक्षा होती. कारण हळूहळू त्या बऱ्याही होत होत्या, असेही डॉक्टर बेले यांनी सांगितले.