जयललितांच्या बंगल्याचे स्मारकात रूपांतर करण्याची मागणी

दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांचे चेन्नईच्या पोज गार्डन भागातील निवासस्थानाचे सार्वजनिक स्मारकात रूपांतर करण्याचे तामिळनाडू सरकारला निर्देश द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका मद्रास उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली.

अशाच रीतीची मागणी करणारी एक याचिका या न्यायालयाच्या मदुराई खंडपीठापुढे करण्यात आली होती व त्यांनी १२ जानेवारी २०१७ रोजीच्या आदेशान्वये फेटाळली होती. त्यामुळे ही याचिका टिकू शकत नाही, असे एस. पार्थिबन यांनी केलेली ही याचिका फेटाळताना न्या. हुलुवाडी जी. रमेश व न्या. आर. महादेवन यांच्या खंडपीठाने सांगितले.

जयललिता या पोज गार्डनमधील ‘वेद निलयम’ बंगल्यात राहत होत्या. त्यांच्या निधनानंतर त्यांचे कायदेशीर वारस नव्हे, तर अण्णाद्रमुक पक्षाचे राजकीय नेते त्यांच्या निवासस्थानाचा वापर करत आहेत. त्यामुळे या बंगल्याचे स्मारकात रूपांतर करण्यात यावे असे निवेदन आपण अधिकाऱ्यांना दिले होते, मात्र त्यावर काही कार्यवाही झाली नाही असे सांगून याचिकाकर्त्यांने न्यायालयाकडे दाद मागितली होती.

अलीकडेच काळजीवाहू मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांनी या निवासस्थानाचे स्मारकात रूपांतर करण्याच्या मागणीला लोकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी स्वाक्षरी मोहीम सुरू केली होती. २४ हजार चौरस फुटांच्या या बंगल्याचे नाव तामिळ चित्रपट उद्योगात ‘संध्या’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जयललिता यांच्या आईच्या नावावर ठेवण्यात आले आहे.