आर्थिक घोटाळ्याप्रकरणी चार वर्षे तुरुंगवासाची झालेली शिक्षा आणि त्यानंतर उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांनी जामिनासाठी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
जयललिता या गेले १२ दिवस तुरुंगाची हवा खात असून उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर न्यायालयाच्या निर्णयास आव्हान देण्याचा निर्णय घेऊन त्यांनी जामिनासाठी आता सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. आपल्याला केवळ चार वर्षांची शिक्षा झाली असून आपल्याला अनेक आजारांनी ग्रासले आहे. त्यामुळे वैद्यकीय कारणांच्या आधारे आपल्याला जामीन मंजूर करण्यात यावा, अशी विनंती करून आपण  कोठेही मुख्यमंत्रिपदाचा गैरवापर केलेला नाही, असाही दावा जयललिता यांनी केला.