तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्यावर मंगळवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तामिळनाडूतील जनता त्यांच्या अम्मांना विसरु शकणार नाही. जयललिता यांचे अनेक किस्से तामिळनाडूमध्ये चर्चिले जातात. या आठवणींमुळेच जयललिता तामिळी जनतेच्या मनात अमर आहेत. जयललिता यांचा हसरा चेहरा अनेकांच्या कायम स्मरणात राहणार आहे. मात्र जयललिता यांचे जीवन दोन छायाचित्रांमुळे बदलले. १९८९ मध्ये इंडियन एक्सप्रेसचे माजी छायाचित्रकार शिवरामन यांनी जयललिता यांची दोन छायाचित्रे टिपली होती. जयललिता यांच्या राजकीय वाटचालीत या छायाचित्रांना मोठे महत्त्व आहे.

ज्या तामिळनाडूच्या विधानसभेत जयललिता मुख्यमंत्री म्हणून मानाने वावरल्या, त्याच विधानसभेत कधीकाळी जयललितांना अपमानाला सामोरे जावे लागले होते. त्यावेळी विधानसभेतून बाहेर पडताना इंडियन एक्सप्रेसचे माजी छायाचित्रकार शिवरामन यांनी जयललिता यांची छायाचित्रे टिपली होती. जयललिता यांचा झालेला अपमान, त्यांच्यासोबत झालेले गैरवर्तन शिवरामन यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात टिपले होते. यानंतर जयललिता यांनी मोठी राजकीय झेप घेतली आणि कधीही मागे वळून पाहिले नाही.

१९८९ मध्ये तामिळनाडूच्या विधानसभेत मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेले करुणानिधी अर्थसंकल्प सादर करत होते. यावेळी करुणानिधी यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात जयललिता वारंवार अडथळा आणत होत्या. यामुळे करुणानिधी आणि जयललितांमध्ये मोठा वाद झाला. यानंतर जयललिता विधानसभेच्या बाहेर जात होत्या. मात्र द्रमुकचे मंत्री दुरई मुरुगन यांनी जयललिता यांची साडी खेचण्याचा प्रयत्न केला. जयललिता यांचा अपमान करुन त्यांना बाहेर घालवण्याचा द्रमुकचा प्रयत्न होता. मात्र द्रमुकचा हा डाव त्यांच्यावरच उलटला. जयललिता फाटलेल्या साडीतच विधानसभेच्या बाहेर आल्या. ‘या लोकांनी माझ्यासोबत कसा क्रूरपणा केला आहे, हे तुम्हीच पाहा,’ असे म्हणत जयललिता यांनी त्यांची फाटलेली साडी प्रसारमाध्यमांना दाखवली. याचा मोठा परिणाम तामिळनाडूमधील लोकांच्या मनावर झाला.

द्रमुक नेत्यांनी डोक्याला मारहाण केल्याचे सांगण्याचा प्रयत्न करणाऱ्या जयललिता (एक्सप्रेस फोटो)
द्रमुक नेत्यांनी डोक्याला मारहाण केल्याचे सांगण्याचा प्रयत्न करणाऱ्या जयललिता (एक्सप्रेस फोटो)

१९८९ मध्ये झालेल्या या अपमानानंतर विधानसभेतून बाहेर पडताना जयललिता यांनी ‘या अपमानाचा बदला घेतल्यावरच विधानसभेत पाऊल ठेवेन,’ असे म्हटले होते. जयललिता यांच्या या अपमानाचा बदला तामिळी जनतेने घेतला. पुढील निवडणुकीत जयललिता यांच्या अण्णाद्रमुकने विजय मिळवला आणि जयललिता मुख्यमंत्री होऊन विधानसभेत परतल्या.

जयललिता यांनी महिलांवरील अत्याचार केव्हाही सहन केले नाहीत. जयललिता यांनी कायमच महिलांच्या हक्कांच्या संरक्षणाची भूमिका घेतली. काही महिन्यांपूर्वी भाजप नेते दयाशंकर सिंह यांनी बहुजन समाजवादी पक्षाच्या सर्वेसर्वा मायावतींवर अतिशय खालच्या पातळीला जाऊन टीका केली होती. मायावतींवर झालेल्या या टिकेचा जयललिता यांनी तीव्र शब्दांमध्ये निषेध केला होता.