News Flash

शपथ घेताच जयललितांच्या घोषणा

हातमागधारकांसाठी २०० युनिट, तर यंत्रमागधारकांसाठी ७५० युनिट मोफत वीजही देण्यात येणार आहे.

| May 24, 2016 03:03 am

तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची सोमवारी चेन्नईत जयललिता यांनी शपथ घेतली. त्यानंतर शपथ घेतलेल्या मंत्र्यांनी जयललितांना अभिवादन केले.

शेतकऱ्यांना कर्जमाफी, घरगुती ग्राहकांना १०० युनिट वीज मोफत

तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची सलग दुसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर जयललिता यांनी सोमवारी निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याचा सपाटा लावला. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आणि घरगुती ग्राहकांना १०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचे आदेश जयललिता यांनी दिले.

मंगळसूत्रासाठी महिला लाभार्थ्यांना सोन्याचे जादा वाटप करण्याचे आणि तामिळनाडू राज्य पणन महामंडळाच्या दारूच्या दुकानांचे कामाचे तास कमी करण्याचे आणि महामंडळाची ५०० दुकाने बंद करण्याचे आदेशही जयललिता यांनी दिले.

शपथविधी पार पडल्यानंतर जयललितांनी तडक सचिवालय गाठले आणि निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी पाच फायलींवर स्वाक्षऱ्या केल्या. सहकारी बँकांना देय असलेले शेतकऱ्यांचे ३१ मार्च २०१६ पर्यंतचे कर्ज माफ करण्याच्या आदेशावर त्यांनी प्रथम स्वाक्षरी केली. यामध्ये पीक कर्ज, लहान शेतकऱ्यांचे मध्यम आणि दीर्घ मुदतीचे कर्ज माफ करण्याचा समावेश असून, त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर ५७८० कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.

त्यानंतर जयललिता यांनी घरगुती वापर असलेल्या वीजग्राहकांना १०० युनिट वीज मोफत देण्याच्या फायलीवर स्वाक्षरी केली. त्यामुळे तामिळनाडू निर्मिती आणि वितरण महामंम्डळाला राज्य सरकारला १६०७ कोटी रुपयांचे अनुदान द्यावे लागणार आहे. त्यानंतर थल्लीक्कू थंगम योजनेसाठी (मंगळसूत्र) महिला लाभार्थ्यांना चारऐवजी आठ ग्रॅम सोने देण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली. महिलांना आता आठ ग्रॅम सोन्याबरोबरच ५० हजार रुपये आर्थिक साहाय्यही मिळणार आहे.

हातमागधारकांसाठी २०० युनिट, तर यंत्रमागधारकांसाठी ७५० युनिट मोफत वीजही देण्यात येणार आहे. राज्यातर्फे चालविण्यात येणारी दारूची ५०० दुकाने बंद करण्याचे आणि बारच्या वेळेत कपात करण्याचे आदेशही दिले. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता जयललिता यांनी केली असून, आपल्या कामातून आपण जनतेबद्दल असलेली आपुलकी दर्शवून देऊ, असे त्या म्हणाल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2016 3:03 am

Web Title: jayalalithaa to be sworn in as tamil nadu cm today
टॅग : Jayalalithaa
Next Stories
1 गोव्यात भाजप-काँग्रेसची हातमिळवणी -केजरीवाल
2 ओम उच्चारल्याने अधिक प्राणवायू!
3 भारत-इराणमध्ये ऐतिहासिक करार
Just Now!
X