चेन्नईमधील पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री जयललिता यांचा तब्बल दीड लाखांच्या मताधिक्याने मंगळवारी विजय झाला. या विजयामुळे तमिळनाडूमधील विधानसभेमध्ये पुन्हा प्रवेश करण्याचा जयललिता यांचा मार्ग मोकळा झाला आहे. जयललिता यांनी या पोटनिवडणुकीत एकतर्फी विजय मिळवला. त्यांच्याविरोधात उभे असलेल्या कम्युनिस्ट पक्षाच्या सी. महेंद्रन यांना अवघी दहा हजार मतेच पडली.
बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी कर्नाटकमधील विशेष न्यायालयाने जयललिता यांना दोषी ठरविल्यानंतर त्यांना मुख्यमंत्रीपदाला आणि आमदारकीला मुकावे लागले होते. या निर्णयाविरोधात त्यांनी तेथील उच्च न्यायालयात दाद मागितली. उच्च न्यायालयाने विशेष न्यायालयाचा निर्णय रद्द ठरवित जयललिता यांना निर्दोष ठरविले होते. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच त्यांनी तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर घटनेप्रमाणे विधानसभेचा सदस्य होण्यासाठी त्यांनी आर. के. नगर विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढविली. या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी झाली. त्यामध्ये जयललिता यांनी दीड लाखांच्या मताधिक्याने एकतर्फी विजय मिळवला.