बिहारमध्ये भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने अर्थात एनडीएने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता कायम राखली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पहाटेपर्यंत सुरु होती. सर्व २४३ जागांचे निकाल हाती असून एनडीएने १२५ जागा मिळवल्या आहेत. या १२५ जागांपैकी ७४ जागांवर विजय मिळवत भाजपा दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. नितीश कुमार यांच्या जदयूने ४३ जागांवर तर मित्र पक्षांनी ८ जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे आता नितीशकुमारच बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील हे स्पष्ट झालं आहे. मात्र त्याचवेळी राष्ट्रीय जनता दलाने ७५ जागा मिळवत बिहारमधला सर्वात मोठा पक्ष होण्याचा पराक्रम केला आहे. तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीने निवडणुक लढवली. महाविकासआघाडीने ११० जागांवर विजय नोंदवल्याने तेजस्वी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही तेजस्वींचे कौतुक केलं आहे. “मेरे हार की चर्चा होगी जरूर मैंने जीत के बाजी हारी है”, अशा शब्दांमध्ये तेजस्वींचा फोटो पोस्ट करत पाटील यांनी ट्विट केलं आहे.

नक्की वाचा >> बिहारमध्ये भाजपाचा मुख्यमंत्री?; नितीश यांना दिलेलं ‘ते’ आश्वासन ठरणार जुमला?

तेजस्वी यादव यांचा फोटो शेअर करताना पाटील यांनी, “बिहारचे निकाल वेगळे लागले असले तरी तेजस्वी यादव यांची झुंज कौतुकास्पद आहे. सत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे. युवकांनी त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी,” असं म्हटलं आहे. तसेच त्यांनी तेजस्वी यांना टॅग करुन वेल डन म्हणत त्यांना शब्बासकीही दिली आहे.

नक्की वाचा >> Bihar Election: “संजय राऊतांमुळे शिवसेनेची महाराष्ट्रातही अशीच अवस्था होईल”

कोणला किती जागा?

तेजस्वी यादव यांचा राजद हा ७५ जागा मिळवत बिहारमधला सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्या खालोखाल भाजपाला  ७४ जागांवर तर जदयूला ४३ जागांवर विजय मिळाला. महाआघाडीतल्या काँग्रेसला १९ जागांवर तर डाव्यांना १६ जागांवर विजय मिळाला आहे. एनडीएमधील मित्र पक्षांना आठ, एमआयएमला पाच जागा तर बसपा, लोजपा आणि अपक्ष यांना प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला आहे.