राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार रेल्वे या सरकारी उपक्रमाचे खासगीकरण करणार नाही, मात्र त्याच्या विकासाकरिता खासगी गुंतवणूकदरांच्या गुंतवणुकीचे स्वागत केले जाईल, असे रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी सांगितले आहे.
रालोआ सरकारच्या कारकीर्दीत भारतीय रेल्वेचे खासगीकरण करण्यास आम्ही अनुकूल नाही, असे भिंड ते इटावा या प्रवासी गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी शनिवारी येथे आलेल्या सिन्हा यांनी पत्रकारांना सांगितले. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हेही या वेळी हजर होते.
रेल्वेमध्ये खासगी गुंतवणुकीसाठी आम्ही तयार आहोत. रेल्वेच्या विकासाकरिता अशा गुंतवणुकीचे सरकार स्वागत करेल, असे सिन्हा म्हणाले.
आर्थिक अडचणी असल्या तरी मध्य प्रदेशातील रेल्वेच्या जाळ्याचा विस्तार करण्यासाठी या वर्षीच्या रेल्वे अर्थसंकल्पात ४२०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले असल्याचेही सिन्हा यांनी सांगितले.