‘काँग्रेसमधील वातावरण प्रदूषित झाले आहे. पर्यावरण मंत्रिपदी असताना मला कोणताही अधिकार नव्हता. कोणत्या प्रकल्पाला मंजुरी द्यायची, कोणाला नाही, हे सर्व राहुल गांधीच ठरवत. मात्र, मी माझ्या सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून सर्व निर्णय घेतले. त्यामुळेच माझी मंत्रिपदावरून गच्छंती झाली. पूर्वीची काँग्रेस आता राहिली नाही. तीन दशकांपासून मी काँग्रेसमध्ये कार्यरत आहे. मात्र, आता घुसमट होत आहे’, असे वाग्बाण सोडत माजी पर्यावरणमंत्री आणि काँग्रेसच्या माजी प्रवक्त्या जयंती नटराजन यांनी शुक्रवारी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. नटराजन यांच्या आरोपांच्या पाश्र्वभूमीवर आता यूपीए सरकारच्या काळात मंजुरी मिळालेल्या सर्व पर्यावरण प्रकल्पांचा पुनर्आढावा घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पक्षात अस्वस्थ असलेल्या जयंती नटराजन यांनी थेट काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनाच पत्र लिहून आपली कैफियत मांडली. मात्र, सोनियांनी त्यांच्या पत्राला उत्तर देण्याचे टाळले. अखेरीस नटराजन यांनी शुक्रवारी चेन्नईत पत्रकार परिषद बोलावून माध्यमांसमोरच आपली कैफियत मांडत पक्षाला सोडचिठ्ठी दिली. तसेच कोणत्याही पक्षात जाण्याचा आपला मानस नसल्याचेही त्यांनी लगोलग स्पष्ट केले. काँग्रेसने मात्र नटराजन यांचे सर्व आरोप फेटाळून लावत त्यांचा बोलविता धनी भलताच असल्याचे स्पष्ट केले.  
जयंती यांचे आरोप..
*मंत्रिपदावरून दूर केल्यानंतर राहुल यांच्या कार्यालयाकडून बदनामी
*मोदींवर स्नूपगेटबाबतचे आरोप करण्यास पक्षाकडूनच दबाव
*भेटीसाठी वारंवार याचना करूनही सोनिया-राहुल यांच्याकडून नकार. पर्यावरण प्रकल्पांना मंजुरी देताना राहुलची सतत ढवळाढवळ