माजी केंद्रीय पर्यावरणमंत्री आणि कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या जयंती नटराजन यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. नटराजन यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहित राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली असून, पक्षात स्वतःवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर कॉंग्रेस पक्षाला एकामागून एक धक्के बसत असून, नटराजन यांच्या पत्रामुळे पक्ष नेतृत्त्व आणखी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. नटराजन यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
‘द हिंदू’ला मिळालेल्या पत्रानुसार नटराजन यांनी सोनिया गांधीपुढे आपली भूमिका मांडली आहे. पक्षातील एका गटाकडून माध्यमांमध्ये माझी बदनामी करण्यात आल्याचा आरोप त्यांनी पत्रातून केला आहे. गेल्या ११ महिन्यात मी तीव्र मानसिक तणाव सहन केला आहे. या काळात माझ्यावर सातत्याने टीका करण्यात आली. माध्यमांमध्ये माझी प्रतिमा मलिन करण्यात आली. सार्वजनिक जीवनात अपमानास्पद वागणूक दिल्याचेही त्यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटले आहे.
राहुल गांधी यांच्यावरही त्यांनी आरोप केले. त्यांच्या कार्यालयातील काही माणसांकडून माझ्याबद्दल माध्यमांना हेतुपुरस्सर माहिती देण्यात येत होती. काही प्रकल्पांना पर्यावरण विभागाची मंजुरी मिळण्यासाठी राहुल गांधी यांच्या कार्यालयाकडून आपल्याकडे विनंतीवजा आदेश देण्यात आले होते. त्या प्रकल्पांवर आपण योग्य तो निर्णय घेतल्याचेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या काही महिनेआधी नटराजन यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगण्यात आले होते. पक्षासाठी काम करण्यासाठी त्यांच्याकडून मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात आला होता.