काँग्रेस-जनता दल(एस) आघाडीला पाचारण करण्याविरोधात याचिका

कर्नाटकात काँग्रेस-जनता दल धर्मनिरपेक्ष यांच्या आघाडीला सरकार स्थापनेस निमंत्रित करण्याच्या राज्यपाल वजूभाई वाला यांच्या निर्णयास आक्षेप घेणारी याचिका, अखिल भारतीय हिंदू महासभेने दाखल केली असून त्यावर तातडीने सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.

न्या. ए.एम खानविलकर व न्या. नवीन सिन्हा यांच्यापुढे याचिकेवर तातडीच्या सुनावणीची मागणी करण्यात आली, पण न्यायालयाने याचिकेवर लगेच सुनावणी केली जाणार नसून, यथावकाश ती केली जाईल असे स्पष्ट केले. तुम्ही याचिका तातडीने सुनावणीला घेण्याची मागणी केली आहे, पण ती मान्य करता येणार नाही असे हिंदू महासभेच्या वकिलास न्यायालयाने सांगितले.

सकाळी ही याचिका महासभेच्या वकिलाने सुनावणीसाठी मांडली, पण दुसऱ्या एका वकिलाने ही याचिका छुपी असून मूळ याचिकार्ती संस्था ती नाहीच असे न्यायालयाला सांगितले. त्यामुळे ही याचिका खरी कोणाची आहे ते आधी ठरवा मग आमच्याकडे या, असे न्यायालयाने या दोघा वकिलांना सांगितले.  नंतर दुपारी दोन वाजता पुन्हा हे प्रकरण सुनावणीस आले असता याचिकाकर्त्यांच्या वकिलाने सांगितले की, आम्ही याचिका दाखल केली आहे,  दुसरे वकील याचिको दाखल करण्यास प्रतिबंध करू शकत नाहीत. ही याचिका कशी काय दाखल करता येईल अशी विचारणा न्यायालयाने केली. त्यावर अखिल भारतीय िहंदू महासभेच्या वकिलाने सांगितले, की आमची संस्था राजकीय असून आम्ही कर्नाटक राज्यपालांच्या बेकायदा कृतीला आव्हान देत आहोत. त्यावर न्यायालयाने सांगितले की, याचिकेत कुठलेही राजकीय प्रतिनिधित्व नाही. त्यावर याचिकाकर्त्यांच्या वकिलाने सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने येडियुरप्पा यांना पाचारण करण्यावर काँग्रेस व जनता दल धर्मनिरपेक्षची याचिका दाखल करून घेतली होती तशी आमचीही करून  घ्यावी. महासभेच्या याचिकेत म्हटले आहे की, काँग्रेस व जनता दल धर्मनिरपेक्ष यांची निवडणुकोत्तर युती हा मोठा घोटाळा असून ती गैर आहे.

सरकार टिकणार नाही

कर्नाटकात काँग्रेस व जनता दल धर्मनिरपेक्ष यांचे आघाडी सरकार फार काळ टिकणार नाही कारण ते स्वार्थी हेतूने एकत्र आलेले आहेत, असे केंद्रीय मंत्री व भाजप नेत्या साध्वी निरंजन ज्योती यांनी सांगितले. अ‍ॅसोचेमच्या कार्यक्रमानिमित्ताने उपस्थित वार्ताहरांना त्यांनी सांगितले की, कर्नाटकातील लोकांनी भाजपला कौल दिला होता. भाजपला सर्वात जास्त १०४ जागा मिळाल्या होत्या. जनता दल धर्मनिरपेक्ष व  काँग्रेस यांनी  स्वार्थी हेतूने आघाडी केली असून ती अभद्र स्वरूपाची आहे, त्यांचे सरकार फार काळ टिकणार नाही. इतिहास बघितला तर अनेकदा जनता दल धर्मनिरपेक्ष या पक्षाने सहभागी पक्षांना नंतर झिडकारले आहे. ते फार काळ लोकांना मूर्खात काढू शकणार नाहीत.