काँग्रेससोबत युती करण्यासासाठी आपण अद्यापही तयार असल्याचं सूचक वक्तव्य केल्यानंतर माजी पंतप्रधान आणि जनता दल सेक्युलरचे अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांनी आता मात्र स्वतंत्र निवडणूक लढणार असल्याचं सांगितलं आहे. कर्नाटकमध्ये मध्यावधी निवडणुका होतील अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. “राज्यात मध्यावधी निवडणूक होण्याची शक्यता आहे. जर तसं झालं तर कोणासोबतही युती न करता स्वतंत्र लढण्यासाठी तयार राहू,” असं देवेगौडा यांनी म्हटलं आहे.

पुन्हा ती चूक करणार नाही असं सांगत देवेगौडा यांनी काँग्रेससोबत युती करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. “पुन्हा ती चूक करणार नाही. सर्व निवडणुका स्वतंत्रपणे लढूयात,” असं देवेगौडा यांनी म्हटलं आहे. कर्नाटकमधील युतीचं सरकार पडल्यानंतर काँग्रेस आणि जेडीएस एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. यादरम्यान गुरुवारी बोलताना देवेगौडा यांनी काँग्रेससोबत युतीची चर्चा करण्यासाठी आपली दारं अद्याप खुली असल्याचं म्हटलं होतं.

बंड पुकारलेल्या १७ आमदारांच्या मतदारसंघात पोटनिवडणूक पार पडणार असून त्याठिकाणी काँग्रेससोबत युती करत निवडणूक लढण्यासाठी आपण तयार असल्याचा सूचक इशारा देवेगौडा यांनी दिला होता. पण हे सर्व काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावर अवलंबून असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.

जुलै महिन्यात एच डी कुमारस्वामी यांच्या नेतृत्त्वातील सरकार कोसळल्यानंतर देवेगौडा आणि सिद्धरमय्या यांनी एकमेकांवर आरोप केले होते. सरकार पडल्यानंतर काँग्रेस आणि जेडीएसमधील नेत्यांचा युती करण्याला विरोध आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी युतीचा निर्णय उच्च पातळीवर घेतला जाईल असं स्पष्ट केलं आहे. काही नेत्यांनी मात्र जेडीएससोबत युती तोडण्याच्या निर्णय अगदी योग्य असल्याचं सांगत आनंद व्यक्त केला आहे.

जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात मध्यावधी निवडणुका होण्याचा अंदाज देवेगौडा यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. आपण आणि कुमारस्वामी राज्यभर दौरा करुन प्रचार करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. भाजपा सरकार १७ बंडखोर आमदारांच्या मदतीने आलं असून ते जास्त काळ टिकणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.