राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) नेतेपदी निवड जेडीयूचे नेते नितीश कुमार यांची निवड झाली आहे. मुख्यमंत्रीपदासाठी नितीश कुमार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं असून सलग चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी तयारीही सुरु झाली आहे. सोमवारी नितीश कुमार यांचा शपथविधी पार पडणार असून त्याआधी त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आपली मुख्यमंत्री होण्याची इच्छा नव्हती असा खुलासा नितीश कुमार यांनी केला आहे.

बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांनी सरकार स्थापनेसाठी नितीश कुमार यांना निमंत्रण दिलं आहे. नितीश कुमार राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनात पोहोचले होते. भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की, “माझी मुख्यमंत्री होण्याची इच्छा नव्हती. भाजापमधून कोणीतरी मुख्यमंत्री व्हावं असं मला वाटत होतं. पण भाजपाने केलेल्या आग्रखातर मी मुख्यमंत्री होत आहे”.

दरम्यान बिहारचे उपमुख्यमंत्री कोण होणार यावरील सस्पेन्स कायम आहे. नितीश कुमार यांना उपमुख्यमंत्रीदेखील उद्या शपथ घेणार का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “याची माहिती थोड्या वेळाने मिळेल. राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा केल्यानंतर उपमुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेतला जाईल”. सोमवारी दुपारी ४.३० वाजता शपथविधी पार पडणार असल्याची माहिती नितीश कुमार यांनी दिली आहे.

जेडीयूचे नेते नितीश कुमार यांची एनडीएच्या नेतेपदी निवड करण्यात आली असून एकदा बिहारचे मुख्यमंत्री होण्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. सोमवारी दुपारी ४.३० वाजता शपथविधी पार आहे. नितीश कुमार सातव्यांदा आणि सलग चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळणार आहेत. एनडीएची बैठक आज पार पडली असून त्यानंतर नितीश कुमार यांची नेतेपदी निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला.