बिहारमध्ये महाआघाडी तोडून भाजपसोबत गेलेल्या नितीश कुमार यांच्यावर ‘नाराज’ असलेले संयुक्त जनता दलाचे ज्येष्ठ नेते शरद यादव यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. एनडीएचे माजी संयोजक असलेल्या शरद यादव यांनी भाजपवर परदेशातील काळ्या पैशांवरुन निशाणा साधला आहे. ‘परदेशातील काळा पैसा परत आणण्याचे आश्वासन भाजपकडून देण्यात आले होते. मात्र परदेशातून काळा पैसा देशात आला नाही आणि पनामा पेपर्स प्रकरणात नाव असलेल्या कोणावरही कारवाई झाली नाही,’ असे शरद यादव यांनी ट्विटरवर म्हटले आहे.

‘सरकारला अनेक सेवांच्या माध्यमातून जनतेकडून मोठ्या प्रमाणावर उपकर मिळतो. मात्र उपकराच्या माध्यमातून इतका पैसा मिळूनही देशातील कोणत्याच क्षेत्रात सुधारणा दिसत नाही,’ असे राज्यसभेचे खासदार असलेल्या शरद यादव यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. याआधी शरद यादव यांनी केंद्र सरकारच्या पीक विमा योजनेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. ‘दुसऱ्या योजनांप्रमाणेच पीक विमा योजनादेखील सरकारचे एक अपयश आहे. या माध्यमातून केवळ खासगी कंपन्यांना लाभ मिळतो,’ असे यादव यांनी म्हटले होते.

शरद यादव यांना महाआघाडीतून बाहेर पडायचे नव्हते, अशी चर्चा बिहारच्या राजकीय वर्तुळात आहे. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष तेजस्वी यादव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. उपमुख्यमंत्रीपदावर असलेल्या तेजस्वी यादव यांच्याविरोधात एफआयआर दाखल झाल्याने त्यांच्या राजीमान्याची मागणी केली जात होती. मात्र तेजस्वी यादव राजीनामा न देण्याच्या भूमिकेवर ठाम होते. त्यामुळे नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत भाजपच्या मदतीने सरकार स्थापन केले. नितीश कुमार यांच्या भाजपसोबत जाण्याच्या निर्णयामुळे शरद यादव नाराज आहेत. शरद यादव यांची नाराजी दूर करण्यासाठी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी त्यांची भेट घेतली होती. मात्र तरीही त्यांची नाराजी कायम आहे.