बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीला न्यायालयातून पसार होण्यासाठी मदत केल्याच्या आरोपावरून बिहारमधील सत्तारूढ जद(यू)चे आमदार सुनील पांडे यांना शनिवारी अटक करण्यात आली.
पांडे हे भाजपूर जिल्ह्य़ातील तरारी मतदारसंघातील आमदार असून ते पोलीस अधीक्षकांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गेले असताना त्यांना अटक करण्यात आली. पांडे यांच्यावर पुढील कारवाई करण्यासाठी त्यांना शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
आरा न्यायालय बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी लंबू शर्मा याने दिल्ली पोलिसांना अलीकडेच कबुलीजबाब दिला त्या आधारे पांडे यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयीन कोठडीतून पसार होण्यासाठी पांडे यांनी मदत केली, असे लंबू शर्मा याने पोलिसांना सांगितले.
आरा न्यायालयात जानेवारी महिन्यात मानवी बॉम्बच्या साहाय्याने करण्यात आलेल्या स्फोटात दोन जण ठार झाले होते, तर २४ जण जखमी झाले होते. लंबू शर्मा हा अन्य एक कैदी अखिलेश उपाध्याय याच्यासह पसार झाला होता. उत्तर प्रदेशातील कुख्यात गुंड आणि राजकीय नेता आमदार मुख्तार अन्सारी याला ठार मारण्यासाठी पांडे यांनी आपल्याला ५० लाख रुपयांची सुपारी दिली होती, असेही शर्मा याने कबुली जबाबात म्हटल्याचे पोलिसांनी सांगितले. पांडे यांच्याविरुद्ध अपहरण आणि खंडणीचे अनेक गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.